news
Home अकोला सिनेस्टाईल पाठलाग! अकोला रेल्वे स्टेशनवर एलसीबीने आवळल्या मारेकऱ्यांच्या मुसक्या

सिनेस्टाईल पाठलाग! अकोला रेल्वे स्टेशनवर एलसीबीने आवळल्या मारेकऱ्यांच्या मुसक्या

अभिषेक गवई हत्याकांड: चालत्या रेल्वेतून आरोपींचा थरारक पाठलाग; अकोला स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अकोला शिवणी येथील हत्येचा छडा; रेल्वेने पळण्याच्या बेतात असलेल्या आरोपींना एलसीबीने अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या

 

 

अकोला प्रतिनिधी विलास सावळे, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला: अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी परिसरात झालेल्या अभिषेक गवई या तरुणाच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत धाडसी कारवाई केली आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या २ तासांत रेल्वे स्टेशनवरून जेरबंद केले.

अयोग जीवन सावद (वय २०, रा. बहुजन नगर, शिवणी) आणि गणेश दयानंद सोनी (वय २०, रा. राहुल नगर, शिवणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत अभिषेक रवींद्र गवई (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवणी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून अयोग सावद आणि गणेश सोनी यांनी अभिषेक गवई याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात अभिषेक गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला.

आरोपी अकोला रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पथकासह स्टेशनवर सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी चालत्या रेल्वेमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्यांचा पाठलाग केला आणि रेल्वे सुटण्यापूर्वीच दोघांनाही बेड्या ठोकल्या.

तपासादरम्यान आरोपींनी जुन्या भांडणातून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजीद पठाण, विष्णू बोडखे आणि पोलीस अंमलदार उमेश पराये, गोकुळ चव्हाण, महेंद्र मलीये, रवी खंडारे, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, एजाज अहमद, खुशाल नेमाडे, स्वप्नील खेडकर, राजसिंह चंदेल, अन्सार अहमद, श्रीकांत पातोंड आणि चालक मनीष ठाकरे, रामकृष्ण डोईफोडे यांनी केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!