news
Home पिंपरी चिंचवड सराईत चेन स्नॅचर वाकड पोलिसांच्या जाळ्यात; ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सराईत चेन स्नॅचर वाकड पोलिसांच्या जाळ्यात; ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

वाहतूक विभागातून काढलेल्या कर्मचाऱ्याचा प्रताप; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलिसांनी आवळल्या मुसक्या | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वाकड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लुटणारा चेन स्नॅचर ४८ तासांत जेरबंद

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: वाकड परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाकड आणि चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:४१ च्या सुमारास वाकड येथील गणेश मंदिर परिसरातील सेव्हन स्टार लेनमध्ये एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना, जांभळ्या-पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपीला तातडीने शोधण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कलम आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सलग दोन दिवस परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. यावरून आरोपीचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित करून पोलिसांनी मान (हिंजवडी) येथून संशयित आरोपी सचिन मानसिंग चव्हाण (वय २७ वर्षे, रा. मान, पुणे) याला ताब्यात घेतले.

आरोपी सचिन चव्हाण हा यापूर्वी पुणे शहर वाहतूक विभागात ‘वॉर्डन’ म्हणून कामाला होता. मात्र, शिस्तभंगाच्या कारवाईमुळे चार महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. मार्च २०२६ दरम्यान त्याने वाहतूक विभागाने जप्त करून ठेवलेल्या वाहनांपैकी एक मोपेड चोरली आणि त्याच चोरीच्या गाडीचा वापर करून त्याने वाकड परिसरात चेन चोरीचे गुन्हे केले.

  • मुद्देमाल: चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, एक होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि एक होंडा ॲक्टिवा स्कूटर (एकूण ४,७५,०००/- रुपये).

  • उघड झालेले गुन्हे:

    १) वाकड पोलीस ठाणे – चेन चोरी (गुन्हा क्र. १७०९/२०२६)

    २) वाकड पोलीस ठाणे – चेन चोरी (गुन्हा क्र. ७३१/२०२६)

    ३) चतुःश्रृंगी पोलीस ठाणे – वाहन चोरी (गुन्हा क्र. १५९/२०२६)

ही यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंमरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, विभीषण कन्हेरकर, संदीप गवारी, वंदू गिरे, आतिश जाधव, बाबाजान इनामदार, वडेकर, मुसळे, दत्तात्रय शिंदे, हांडे, खैरे, खराडे, विक्रम भगत, कांबळे, झांबरे आणि मयूर गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!