अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बालविवाहाचे सावट नको; अकोल्यात ‘सतर्कता दिवस’ पाळून जनजागृती
अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे , २१ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी ‘इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी’ अकोला या संस्थेने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात ‘सतर्कता दिवस’ पाळला. बालहक्कांचे संरक्षण आणि बालविवाहास आळा घालण्यासाठी राबविलेल्या या मोहिमेला बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (CMPO) आणि आशा स्वयंसेविकांनी मोठा पाठिंबा दिला आहे.
शाळा, पंचायती आणि गावागावांमध्ये ही संस्था प्रशासनाच्या मदतीने जनजागृती करत असून, हजारो नागरिकांनी बालविवाह न करण्याची शपथ घेतली आहे. विशेषतः अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या काळात या प्रतिबंधात्मक मोहिमा अधिक तीव्र केल्या जातात.
इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा (PCMA) २००६ मधील तरतुदींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “बालविवाह हा एक घृणास्पद गुन्हा आहे. यामध्ये केवळ मुलीचे कुटुंबच दोषी नसते, तर केटरर्स, डेकोरेटर्स, बँड पथक, मंगल कार्यालय मालक आणि लग्न लावणारे भटजी किंवा मौलवी यांनाही २ वर्षांचा कारावास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.”
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आता तळागाळात जागरूकता वाढली असून नागरिक स्वतःहून बालविवाहाच्या घटनांची माहिती प्रशासनाला देत आहेत. ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन’ या देशातील मोठ्या जाळ्याशी ही संस्था जोडलेली असून, त्या माध्यमातून आतापर्यंत देशभरात ५ लाखांहून अधिक बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या या सतर्कतेमुळे जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. २०३० पूर्वी अकोला जिल्हा पूर्णपणे बालविवाहमुक्त होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

