रहाटणीतील नखाते नगरचा पाणीप्रश्न सुटला; आमदार शंकर जगताप यांच्या सूचनेनंतर प्रशासनाची वेगवान हालचाल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
रहाटणी: रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील नखाते नगर परिसरातील नालंदा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी आणि निसर्ग कॉलनी येथील नागरिक मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येचा सामना करत होते. अखेर आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा पाणीप्रश्न निकाली निघाला असून परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नखाते नगरमधील या सोसायट्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत होता. यामुळे महिला वर्गाचे प्रचंड हाल होत होते. ही समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी स्थानिक रहिवाशांनी कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती.
नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. आमदारांच्या सूचनेनंतर पाणीपुरवठा विभागाने यंत्रणा कार्यान्वित केली आणि तांत्रिक दोष दूर करून पाणीपुरवठा सुरळीत केला.
“नागरिकांची सोय हीच आमची प्राथमिकता आहे. रहाटणीकरांचा विश्वास आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकासाचा ध्यास घेतला आहे. नखाते नगरमधील पाणीप्रश्न सुटल्याने समाधान वाटते,” अशा भावना नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी व्यक्त केल्या.
दोन महिन्यांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने नालंदा, श्रीकृष्ण व निसर्ग कॉलनीतील नागरिकांनी आमदार शंकर जगताप आणि नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे आभार मानले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



