news
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत साकारणार माता रमाईंचे ऐतिहासिक स्मारक! २८ एप्रिलला रामदास आठवलेंच्या हस्ते होणार भूमीपूजन

पिंपरीत साकारणार माता रमाईंचे ऐतिहासिक स्मारक! २८ एप्रिलला रामदास आठवलेंच्या हस्ते होणार भूमीपूजन

७.५ फुटी पुतळा आणि जीवनप्रवास उलगडणारी २५ म्युरल्स; २३ कोटी ५५ लाखांचा भव्य प्रकल्प; कुणाल वाव्हळकरांच्या पाठपुराव्याला मोठे यश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माता रमाईंच्या देशातील पहिल्या स्मारकाची पिंपरीत मुहूर्तमेढ; २८ तारखेला रामदास आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २५ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या देशातील पहिल्या भव्य स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २८ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी येथे या ऐतिहासिक स्मारकाचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या संदर्भात आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारील आरक्षित जागेत माता रमाईंचे स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नगरसेवक कुणाल वाव्हळकर, धर्मपाल तंतरपाळे, डॉ. सुहास कांबळे आणि माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर महापालिकेत भाजप-आरपीआय युतीची सत्ता आल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे.

चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत निधीची चणचण असतानाही, आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी अर्थसंकल्पात विशेष सुधारणा करून या स्मारकासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. यामुळे रेंगाळलेला हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

  • क्षेत्रफळ: सुमारे २५,००० चौ. फूट भूखंडावर हा प्रकल्प साकारणार.

  • खर्च: एकूण २३ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद.

  • मुख्य आकर्षण: ७.५ फूट उंचीचा भव्य पुतळा आणि २५ आकर्षक म्युरल्सच्या माध्यमातून माता रमाईंच्या जीवनकार्याचा प्रवास.

  • सुविधा: अद्यावत अभ्यासिका, प्रतीक्षा गृह, सुंदर कारंजे, प्रशस्त उद्यान, बैठक व्यवस्था आणि अत्याधुनिक रोषणाई.

  • कालावधी: पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


“माता रमाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांना दिलेला आधार अतुलनीय आहे. हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेले हे स्मारक भव्य आणि सुबक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ऐतिहासिक कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो.”

– कुणाल वाव्हळकर, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले) व नगरसेवक.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!