निगडीत ‘आमदार चषक’ जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार सुरू; ग्रामीण खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २५ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळालाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी क्रीडा क्षेत्र अनिवार्य आहे. खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच मिळत नाही, तर नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासही विकसित होतो,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात ‘ग्रामीण खेळाडू विकास प्रकल्प’ व आमदार उमा खापरे यांच्या वतीने आयोजित ‘आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६’ चे उद्घाटन महापौर लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विधानपरिषद सदस्या आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिकेच्या कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्य अमित गावडे, ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर, जयदीप खापरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी संघभावना आणि शिस्त आत्मसात करण्यासाठी खेळांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. अशा जिल्हास्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होते. याच मैदानातून उद्याचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा विश्वास मला आहे.”
या जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना आपली कौशल्ये दाखविण्याची मोठी संधी मिळाली आहे. उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यांदरम्यान खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयीचे आकर्षण वाढेल, अशा भावना सहभागी खेळाडूंनी यावेळी व्यक्त केल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



