घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; महाळुंगे पोलिसांकडून ३८ वर्षीय महिलेला अटक, १३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाळुंगे: दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली दिवसाची घरफोडी उघड करण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका ३८ वर्षीय महिलेला अटक केली असून, तिच्याकडून १० तोळे सोन्याचे दागिने (किंमत १३,८७,००० रुपये) असा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी दक्षिण महाळुंगे परिसरात दिवसा घरफोडी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. फिर्यादीच्या घरातून कपाटात ठेवलेले १० तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले होते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१), ३०५(+) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात एका संशयित महिलेचा वावर दिसून आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सारिका संतोष भुजबळ (वय ३८, रा. पवार चाळ, तळेगाव दाभाडे, मावळ) हिला ताब्यात घेतले.
पोलीस खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, आरोपी महिला ही फिर्यादीच्या ओळखीची असून तिला घरातील दागिन्यांबाबत माहिती होती. तिने घराच्या बनावट चावीचा वापर करून दिवसा घर उघडले आणि चोरी केली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, उपनिरीक्षक भारत करे आणि पथकातील अंमलदार युवराज बिराजदार, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, चेतन सावंत, महिला पोलीस अश्विनी महाडीक, वैष्णवी बालपांडे व इतर सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर सांगळे करत आहेत.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाच्या या वेगवान कामगिरीचे कौतुक केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
