news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या महामार्गाला मिळणार अण्णासाहेब मगर यांचे नाव! महापौरांची ऐतिहासिक घोषणा

पिंपरी-चिंचवडच्या महामार्गाला मिळणार अण्णासाहेब मगर यांचे नाव! महापौरांची ऐतिहासिक घोषणा

शहराच्या शिल्पकाराच्या १०७ व्या जयंतीनिमित्त दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन; महामार्गाच्या नामकरणाची महत्त्वाची घोषणा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दापोडी ते निगडी या राष्ट्रीय महामार्गाला अण्णासाहेब मगर यांचे नाव देणार – महापौर रवी लांडगे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार आणि कै. खासदार अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या दापोडी ते निगडी या राष्ट्रीय महामार्गाला त्यांचे नाव देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महापौर रवी लांडगे यांनी आज येथे केली.

अण्णासाहेब मगर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त अंशुल प्रकाशनच्या वतीने त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महापौर बोलत होते. दापोडी ते निगडी हा महामार्ग सध्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी महापालिकेच्या ताब्यात असल्याने नामकरणाचा निर्णय घेण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. प्रशासनाशी चर्चा करून लवकरच याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक शितल शिंदे, अनंत कोऱ्हाळे, अमित गावडे, नगरसेविका अरुणा लंगोटे आणि माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अंशुल प्रकाशनचे संचालक विजय जगताप आणि लेखिका डॉ. सीमा काळभोर यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. अण्णासाहेबांच्या जीवनातील विविध दुर्मिळ प्रसंग आणि त्यांच्या कार्याची सुमारे ४५ छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी अण्णासाहेबांच्या भाषणांच्या आठवणींना उजाळा दिला, तर आमदार शंकर जगताप यांनी आपले वडील ह.भ.प. पांडुरंग जगताप यांना अण्णासाहेबांचा लाभलेला सहवास आणि त्या काळातील पंचायत समितीच्या कामाच्या आठवणी सांगितल्या.

आमदार अमित गोरखे यांनी अण्णासाहेबांचे कार्य शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांमध्ये अशा प्रदर्शनांचे आयोजन करण्याची आणि त्यांच्या जीवनावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्याची सूचना केली. अभिषेक बारणे, भाऊसाहेब भोईर आणि शत्रुघ्न काटे यांनीही अण्णासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.

हे प्रदर्शन येत्या २९ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी बारणे, नंदू भोगले आणि वेदांत काळभोर यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन डॉ. सीमा काळभोर यांनी केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!