news
Home पिंपरी चिंचवड योगेश बहल यांच्यासाठी पिंपरी-चिंचवडचे शिष्टमंडळ ‘देवगिरी’वर! विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडे साकडे

योगेश बहल यांच्यासाठी पिंपरी-चिंचवडचे शिष्टमंडळ ‘देवगिरी’वर! विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडे साकडे

सातवेळा नगरसेवक आणि माजी महापौरपदाचा अनुभव; अल्पसंख्याक चेहरा म्हणून बहल यांच्या नावाची चर्चा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडला विधान परिषदेची संधी मिळावी; योगेश बहल यांच्या नावाचा कार्यकर्त्यांकडून आग्रह

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २८ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आगामी विधान परिषद निवडणुकीत शहराला प्रतिनिधित्व मिळावे, अशी आग्रही मागणी शहराच्या वतीने करण्यात आली आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर योगेश बहल यांचे नाव एकमताने सुचवण्यात आले असून, या मागणीचे निवेदन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना देण्यात आले.

सोमवारी (दि. २७ एप्रिल २०२६) पिंपरी-चिंचवडमधील आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील ‘देवगिरी’ निवासस्थानी ही भेट घेतली. यावेळी शहराच्या राजकीय सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

योगेश बहल हे सन १९९२ पासून आजतागायत सलग सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शहराध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. शहरातील सर्व जाती-घटकांना सोबत घेऊन काम करणारा आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आणि महापालिकेत सत्ता आणण्यासाठी त्यांनी आजवर मोलाचे कार्य केले असून, ते अजितदादांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात.

  • अनुभवाला न्याय: पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून आरक्षित असल्याने खुल्या प्रवर्गातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. बहल यांच्या रूपाने या अनुभवाला न्याय मिळावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

  • विकासाला गती: शहरात सध्या राष्ट्रवादीचा एकच आमदार (पिंपरी मतदारसंघ) आहे. संपूर्ण शहराच्या विकासासाठी आणि प्रशासनाकडून प्रभागातील कामे करून घेण्यासाठी विधान परिषदेचे बळ असणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

  • कॉस्मोपॉलिटन शहराला संदेश: पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक आणि आयटी नगरी असून येथे सर्वधर्मीय नागरिक राहतात. अशा ‘कॉस्मोपॉलिटन’ शहरात बहल यांच्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील अनुभवी व्यक्तीला संधी दिल्यास संपूर्ण शहरात सकारात्मक संदेश जाईल.

यावेळी डॉ. वैशाली घोडेकर, डब्बू आसवाणी, शाम लांडे, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतीक्षा जवळकर-लांघी, दीप्ती कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सारंग कामतेकर, तानाजी खाडे, माऊली मोरे, रवींद्र ओव्हाळ, युसूफ कुरेशी, दीपक साकोरे, राजू लोखंडे, निलेश शिंदे, अंबरनाथ कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवेदनावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!