news
Home पिंपरी चिंचवड जीवघेण्या केबलचा बळी! निगडीत दुचाकीस्वार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; प्रशासकीय दुर्लक्षाचा फटका

जीवघेण्या केबलचा बळी! निगडीत दुचाकीस्वार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; प्रशासकीय दुर्लक्षाचा फटका

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आयुक्तांकडे धरला कारवाईचा लावून धराव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शहरातील लटकणाऱ्या केबलने घेतला महिलेचा बळी; उपमहापौर शर्मिला बाबर आक्रमक, केबल धारकांवर कारवाईची मागणी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि लटकणाऱ्या तारांचे जाळे आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. निगडी प्राधिकरण येथे रस्त्यावर लटकणाऱ्या केबलमध्ये गळा अडकून झालेल्या भीषण अपघातात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या कोषाध्यक्षा संपदा संदीप पटवर्धन (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून, उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी निगडी प्राधिकरण, सेक्टर २६ येथील शितद्वाया सोसायटीसमोरून संपदा पटवर्धन या दुचाकीवरून जात होत्या. यावेळी दुर्गेश्वर पथ मार्गावर फायबर नेटवर्कची एक केबल खाली लटकत होती. ही केबल पटवर्धन यांच्या गळ्यात अडकल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना तातडीने निवेदन दिले आहे. “शहरात इंटरनेट, टेलिफोन आणि केबल टीव्हीच्या तारांचे जाळे बेकायदेशीरपणे पसरले आहे. झाडांवर धातूच्या तारा टाकल्या जातात ज्या अंधारात दिसत नाहीत. या निष्काळजीपणामुळेच एका महिलेचा बळी गेला आहे. संबंधित केबल धारकांनी या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई दिली पाहिजे,” अशी मागणी शर्मिला बाबर यांनी केली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

  • केबल हटवा: निगडी प्राधिकरणासह शहरातील सर्व अनधिकृत व धोकादायक केबल तारा २४ तासांच्या आत काढून टाकाव्यात.

  • कडक कारवाई: ज्या कंपनीच्या केबलमुळे हा अपघात झाला, त्या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याबाबत नियमानुसार कारवाई व्हावी.

  • कायमस्वरूपी धोरण: शहरात केबल टाकण्याबाबत तातडीने कडक धोरण तयार करावे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी केबल्स जमिनीपासून केवळ ५-६ फूट उंचीवर लटकत आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना या तारा दिसत नसल्याने जीवघेणे अपघात घडत आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही उपमहापौर शर्मिला बाबर यांनी दिला आहे. संपदा पटवर्धन यांच्या निधनामुळे प्राधिकरण परिसरात शोककळा पसरली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!