प्रफुल्ल पुराणिक यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून ‘बॅचलर ऑफ जर्नलिज्म’ पदवी प्रदान
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी (PRO) प्रफुल्ल पुराणिक यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. श्रीमती गीताली टिळक यांच्या हस्ते प्रफुल्ल पुराणिक यांना ‘बॅचलर ऑफ जर्नलिज्म अँड मास कम्युनिकेशन’ (B.J. in Print Media – PG) ही पदवी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांनी ही पदवी प्रथम श्रेणीत (First Class) संपादन केली आहे.
प्रफुल्ल पुराणिक हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील एक उमदे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. महापालिकेच्या प्रत्येक मीटिंगमध्ये स्वतः प्रस्तावना मांडण्यापासून ते प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यापर्यंत त्यांचा कामाचा आवाका मोठा आहे. त्यांना महानगरपालिकेच्या सर्व विभागांची आणि शहरातील सामाजिक-राजकीय घडामोडींची खडान् खडा माहिती तोंडपाठ आहे. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात तसेच शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.
केवळ कामापुरते मर्यादित न राहता, प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला योग्य मान-सन्मान देऊन बोलणे आणि प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणे ही पुराणिक यांची खासियत आहे. शहरातील कोणताही सामाजिक किंवा शैक्षणिक कार्यकर्ता असो, त्यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोणत्याही सरकारी कामात हिरीरीने सहभाग घेऊन ते काम तडीस नेण्यात त्यांचा हातखंडा आहे.
प्रफुल्ल पुराणिक यांनी वयाचा किंवा पदाचा विचार न करता सातत्याने आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी ही पदवी मिळवली आहे. या यशाबद्दल महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,” हेच त्यांनी या पदवीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


