पिंपरी-चिंचवडच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवरील उत्तुंग भरारी; कबीर कांबळे भारतीय वन सेवेत (IFS) दाखल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी येथील कु. कबीर राहुल कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. कबीर यांनी देशभरातून १२५ वी रँक मिळवत भारतीय वन सेवेसाठी (Indian Forest Service – IFS) आपली निवड निश्चित केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते आज त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कठोर परिश्रम, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य या जोरावर कबीर यांनी हे यश खेचून आणले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान उंचावला असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शहरातील हजारो तरुणांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरले आहेत.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, “भारतीय वन सेवेच्या माध्यमातून कबीर कांबळे हे देशाचे पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संपत्तीच्या जतनासाठी निश्चितच उल्लेखनीय कार्य करतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या या यशामुळे शहराची मान अभिमानाने उंचावली आहे.”
या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसदस्या वैशाली घोडेकर, नगरसदस्या सारिका मासूळकर तसेच कबीर कांबळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांनी कबीर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी प्रशासकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
