स्वच्छ पिंपरी चिंचवडसाठी तुमचा अभिप्राय द्या; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छतेत शहराला देशात अव्वल स्थानावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या कामगिरीचा एक महत्त्वाचा मापदंड मानला जातो. या पार्श्वभूमीवर, उपमहापौरांनी नागरिकांना पुढाकार घेऊन आपला अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, “आपले शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नसून, त्याला लोकशक्तीची जोड मिळणे आवश्यक आहे. स्वच्छ सर्वेक्षणात दिलेला तुमचा अभिप्राय हा शहराच्या विकासाला योग्य दिशा देणारा ठरेल. आपण सर्वांनी मिळून पिंपरी चिंचवडला देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार करूया.”
शहराला स्वच्छतेच्या क्रमवारीत आघाडीवर ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनासोबत एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपला फीडबॅक देता येणार आहे. त्यासाठी संकेतस्थळ: https://cf.sbmurban.org या लिंकला भेट द्यावी. त्यातील सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपला अभिप्राय नोंदवावा.
या मोहिमेला गती देण्यासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वतः देखील आपला अभिप्राय नोंदवून नागरिकांसमोर आदर्श ठेवला आहे. जास्तीत जास्त शहरवासियांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या शहराचा गौरव वाढवावा, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

