कुदळवाडीतील धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करा; आरपीआयचे अजिज शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी परिसरात मंदिर आणि मशिदीवर अचानक केलेल्या कारवाईमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि धार्मिक भावनांचा विचार न करता करण्यात आलेल्या या कारवाईचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक आघाडी) चे राज्याध्यक्ष अजीज भाई शेख यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पाडलेली धार्मिक स्थळे महापालिकेने स्वखर्चाने पुन्हा बांधून द्यावीत, अशी मागणी त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
पिंपरी येथे मंगळवारी (दि. १२) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, शहर सरचिटणीस बाबा सरोदे, गजानन घुगे आदी उपस्थित होते.
अजीज भाई शेख यांनी सांगितले की, “प्रशासनाने अतिशय संवेदनशील जागेवर बूट-चपला घालून प्रवेश केला, ज्यामुळे धार्मिक स्थळांचे पावित्र्य भंग पावले आहे. शुक्रवारी मुस्लिम समाज नमाजसाठी जातो आणि शनिवारी हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी असते. अशा पवित्र दिवशी कारवाई करून दोन समाजांत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही.”
“जर ही धार्मिक स्थळे विकासकामात अडथळा ठरत होती, तर प्रशासनाने आम्हाला विश्वासात घेऊन पूर्वकल्पना द्यायला हवी होती. आम्ही स्वतःहून जागा ॲडजस्ट करून दिली असती. मात्र, कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली येऊन अशा प्रकारे अचानक पाडकाम करणे चुकीचे आहे,” असेही शेख यांनी नमूद केले. या विटंबनेस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची आणि दबाव टाकणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुनर्बांधणी: पाडलेली धार्मिक स्थळे महापालिकेने स्वखर्चाने पुन्हा उभी करून द्यावीत.
बेरोजगारांना मदत: कुदळवाडीतील कारवाईत ज्या गोरगरीब लोकांचे रोजगार गेले आहेत, त्यांना पुन्हा व्यवसायाची संधी द्यावी.
हरकतींचा निकाल: विकास आराखड्यावरील ५० हजारांहून अधिक हरकतींचा निकाल आयुक्तांनी तातडीने लावावा.
चौकशी: बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली केलेल्या कारवाईत प्रत्यक्षात कोणीही संशयास्पद आढळले नाही, या प्रकरणाची सत्यता तपासली जावी.
“संविधानाचा आधार घेऊन आम्ही या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरू. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गणपती बाप्पांची आरती आणि मशिदीत नमाज पठण करून शांततामय मार्गाने विरोध नोंदवू,” असा इशारा शेख यांनी दिला. या संदर्भात आमदार महेश लांडगे यांनाही निवेदन देऊन मंदिर व मशीद पुन्हा बांधण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
