33
सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप परवानगी शुल्क पूर्णपणे माफ करा; सलग तीन वर्षांसाठी एकत्रित परवानगी द्या; नगरसेविका रिटा सानप यांची आयुक्तांकडे आग्रही मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: औद्योगिक आणि सांस्कृतिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. या उत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणित करण्यासाठी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप परवानगी शुल्क पूर्णपणे माफ करावे आणि दरवर्षीच्या किचकट प्रक्रियेतून मुक्ती देत सलग तीन वर्षांसाठी एकत्रित परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर रवि लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेविका रिटा सानप यांनी थेट महापालिका प्रशासनाकडे गणेश मंडळांची बाजू मांडल्यामुळे शहरातील तमाम गणेशोत्सव कार्यकर्त्यांमधून त्यांच्या या निर्णयाचे आणि तत्परतेचे जोरदार स्वागत केले जात आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरातील विविध मंडळे सामाजिक प्रबोधन, आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजाला जोडण्याचे काम करतात. या पार्श्वभूमीवर नगरसेविका रिटा सानप यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, पूर्वी महापालिकेकडून मंडळांना आर्थिक मदत दिली जात होती. मात्र, सध्या मंडप उभारणीसाठी पालिकेकडून मोठे शुल्क आकारले जात आहे, ज्यामुळे लहान-मोठ्या मंडळांवर आर्थिक ताण पडत आहे.
“गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेशी निगडित असलेला अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. शहरात सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन हा उत्सव जोमात साजरा करतात. दरवर्षी नव्याने कागदपत्रे गोळा करणे, अर्ज करणे आणि परवानगी मिळवणे यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा वेळ आणि श्रम खर्च होतात. त्यामुळे मंडळांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मंडप परवानगी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे आणि सलग तीन वर्षांसाठी एकत्रित परवानगी देण्याची सुटसुटीत व्यवस्था करावी.”— नगरसेविका रिटा सचिन सानप (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी नेहमीच प्रभागातील आणि शहरातील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. गणेशोत्सवासारख्या महाउत्सवामध्ये रात्री-अपरात्री राबणाऱ्या कार्यकर्त्यांची अडचण ओळखून त्यांनी ही अत्यंत रास्त आणि योग्य मागणी केली आहे.
दरवर्षीच्या परवानग्यांच्या फेऱ्यांमधून सुटका मिळावी आणि शुल्काचा ताण कमी व्हावा, या मागणीमुळे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून नगरसेविका रिटा सानप यांच्या या जनहितैषी आणि अभ्यासू पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन गणेश मंडळांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

