34
धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस; पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात त्वरित रद्द करा; शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांची आयुक्तांकडे आग्रही मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून शहरावरील पाण्याची चिंता मिटली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात तात्काळ रद्द करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना उपनेत्या, माजी विरोधी पक्षनेत्या तथा ज्येष्ठ नगरसेविका सौ. सुलभा रामभाऊ उबाळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा आणि समस्यांबाबत नेहमीच तत्परतेने धावून जाणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पुन्हा एकदा जनहितार्थ कठोर आणि थेट भूमिका घेतली आहे.
गेल्या काही दिवसांत धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी असल्याने महापालिका प्रशासनाकडून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, आता धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. असे असतानाही पाणीकपात कायम राहिल्याने नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत असून दैनंदिन कामात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांकडून सतत तक्रारी येत होत्या.
जनतेचा हा त्रास लक्षात घेताच, ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांनी प्रशासनाला थेट धारेवर धरत १२ ऑगस्ट २०२६ रोजी आयुक्तांना अधिकृत पत्र पाठवले.
“धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरण भरले असून पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. परंतु, अजूनही पाणीकपात लागू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही विलंबाविना शहरातील पाणीकपात रद्द करावी आणि पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करून नागरिकांना मोठा दिलासा द्यावा.”— सौ. सुलभा रामभाऊ उबाळे (शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका, पिं.चिं. म.न.पा.)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या, माजी शिवसेना गटनेत्या (२००७-२०१७) तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून काम केलेल्या सुलभा उबाळे यांची शहराच्या विकासकार्यात आणि प्रशासकीय कामकाजात मोठी पकड आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
नेहमीप्रमाणेच ‘कटिबद्ध जनहितासाठी’ या तत्त्वावर चालणाऱ्या सुलभाताईंनी ऐन गरजेच्या वेळी नागरिकांचा आवाज बनून प्रशासनाला जाब विचारल्यामुळे शहरातील नागरिकांमधून त्यांच्या तत्पर आणि अभ्यासू नेतृत्वाचे कौतुक होत आहे. या पत्राची प्रत ‘अ’ प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही रवाना करण्यात आली असून, महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
