25
चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहीम सुरू; अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांचे आवाहन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रातील २०५ चिंचवड, २०६ पिंपरी (अ.जा.) आणि २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघांमधील मतदार याद्या अधिक अद्ययावत व अचूक करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेची अंमलबजावणी वेगाने सुरू करण्यात आली आहे. शहरातील सर्व पात्र नागरिक, नामवंत मान्यवर, उद्योजक, अधिकारी, कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती व पत्रकारांची नावे मतदार यादीत असावीत, यासाठी महापालिकेकडून विशेष भर दिला जात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत सध्या बीएलओ (BLO) यांच्यामार्फत घरोघरी जाऊन ‘EF फॉर्म’ (गणना पत्रक) वाटप व स्वीकृतीचे काम सुरू असून, सुधारित वेळापत्रकानुसार नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
१. ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६: बीएलओ (BLO) मार्फत ‘EF फॉर्म’ (गणना पत्रक) चे घरोघरी वाटप व संकलन.
२. २४ ऑगस्ट २०२६: प्रारूप (Draft) मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी.
३. २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६: प्रारूप यादीवर नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.
४. ०५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६: प्राप्त दावे व हरकतींवर नोटीस बजावणी आणि सुनावणी प्रक्रिया.
५. २७ ऑक्टोबर २०२६: अंतिम (Final) मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी शहरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सभासद, पत्रकार, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खातरजमा करावी. नाव समाविष्ट नसल्यास १७ ऑगस्टपर्यंत नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयात किंवा संबंधित बीएलओ (BLO) यांच्याशी संपर्क साधून ‘EF फॉर्म’ भरून द्यावा.
कोणताही पात्र नागरिक आपल्या मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून हे पाऊल उचलले जात असून सर्वांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
