news
Home पिंपरी चिंचवड प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथके तैनात; तक्रार प्राप्त होताच तातडीने कार्यवाही सुरू

प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथके तैनात; तक्रार प्राप्त होताच तातडीने कार्यवाही सुरू

पिंपरी पालिकेची खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम; १,६०९ खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये खड्डे बुजविण्याची मोहीम युद्धपातळीवर; २,१६४ पैकी १,६०९ खड्डे बुजविले, महापालिका ॲक्शन मोडमध्ये!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत अत्यंत वेगाने आणि युद्धपातळीवर राबविली जात आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींची प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली जात असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या २,१६४ तक्रारींपैकी १,६०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५५५ खड्ड्यांची दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत तक्रार प्राप्त होताच ठिकाणाची पाहणी, खड्ड्याची स्थिती व वाहतूक तपासून योग्य साहित्याची निवड केली जात आहे. आतापर्यंत बुजविण्यात आलेल्या १,६०९ खड्ड्यांपैकी ५५६ खड्डे कोल्ड मिक्स, २३ बीबीएम, ७५४ जीएसबी, १२० पेव्हिंग ब्लॉक आणि १५६ खड्डे काँक्रिटच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत.

शहरातील प्रत्येक प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ आणि वाहनांसह स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने डांबर प्लांट बंद आहेत, त्यामुळे कोल्ड मिक्स, जीएसबी, पेव्हिंग ब्लॉक आणि काँक्रिटचा वापर केला जात आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बुजविलेले खड्डे पुन्हा खराब होत असून, अशा ठिकाणी पुन्हा पाहणी करून दुरुस्ती केली जात आहे.

पावसामुळे सध्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले जात आहेत. पावसाची मोठी उघडीप मिळाल्यानंतर व पावसाळ्यानंतर डांबर प्लांट सुरू झाल्यावर या रस्त्यांवर कायमस्वरूपी डांबरीकरण केले जाणार आहे.
तसेच, ज्या रस्त्यांचा ‘दोषदायित्व कालावधी’ (Defect Liability Period – DLP) अद्याप बाकी आहे, त्या रस्त्यांवरील खड्डे संबंधित ठेकेदारांकडूनच बुजवून घेतले जातील. दुरुस्तीस टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

“रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत सर्व यंत्रणांना सक्त सूचना दिल्या आहेत. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे. कामावर नियमित नियंत्रण ठेवण्यात येत असून तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“पावसाची तीव्रता आणि सातत्यामुळे काही ठिकाणी तात्पुरते बुजविलेले खड्डे पुन्हा खराब होत आहेत. नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून काम सुरू आहे. पावसाची उघडीप मिळताच दुरुस्तीची कामे अधिक प्रभावीपणे करून आवश्यक तिथे कायमस्वरूपी डांबरीकरण केले जाईल.”
— प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!