news
Home अमरावती स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक टुरिस्ट प्लॅन तयार करण्याच्या सूचना

स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक टुरिस्ट प्लॅन तयार करण्याच्या सूचना

चिखलदऱ्यात आदिवासी पर्यटनाला चालना; आमझरी व खटकली परिसरात भव्य पर्यटन संकुल उभारणार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आमझरी व खटकली परिसरात पर्यटनसंकुल उभारणार; आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांचे निर्देश!

अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: चिखलदरा तालुक्यातील आमझरी आणि खटकली या निसर्गरम्य गावांमध्ये पर्यटन विकासाच्या अफाट संधी असून स्थानिक आदिवासी समाजाला रोजगाराचे नवे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी येथे भव्य ‘पर्यटन संकुल’ (Tourism Complex) उभारण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्त तथा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिले आहेत.
वनविभागाच्या आमझरी संकुलात आयोजित विशेष संवाद बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, सह आयुक्त दिगंबर चव्हाण, उपायुक्त संतोष ठुबे, उपायुक्त विनिता सोनवणे, उपायुक्त शशिकला अहिरराव, शबरी महामंडळाचे शाखा व्यवस्थापक गणेश साखरे, वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि पर्यटन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमझरी व खटकली परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचे संवर्धन करत पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळे, अनुभव आणि मार्गदर्शनाचा परिपूर्ण आराखडा तयार केला जाईल. पर्यटकांना पारंपरिक आदिवासी भोजनाचा आस्वाद घेता यावा यासाठी पारंपरिक रेसिपींचे अधिकृत दस्तऐवजीकरण केले जाईल. यामुळे स्थानिक महिला व तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील. शबरी महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांतून स्थानिक पातळीवर ‘होम-स्टे’ सुविधांना प्रोत्साहन दिले जाईल. पर्यटकांकडून होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी कठोर नियमावली व आचारसंहिता लागू केली जाईल, तसेच नियमित साफसफाईची व्यवस्था केली जाईल. या भागात पर्यटकांची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी रस्ते विकास, कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला जाईल. आदिवासींची पारंपरिक कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हस्तकला यांच्या माध्यमातून पर्यटनाला अधिक आकर्षक बनवले जाईल.

बैठकीच्या सुरुवातीला स्थानिकांनी पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. या वेळी स्थानिक नागरिक व ‘होम-स्टे’ योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. पुढील टप्प्यात या योजनेची अंमलबजावणी आणि तांत्रिक बाबींचे नियोजन संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तातडीने केले जाणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!