39
चार-बिन कचरा विलगीकरणातून प्रक्रिया अन् पुनर्वापराला मिळणार गती; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून व्यापक जनजागृती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मधील उत्तम कामगिरीच्या पार्श्वभूमीवर शहरात कचरा विलगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व्यापक स्तरावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष गृहभेटी (Home Visits) देऊन नागरिकांना ‘चार-बिन’ (Four-Bin) कचरा विलगीकरण पद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.
घरात दररोज निर्माण होणारा ओला, सुका, सॅनिटरी (स्वच्छताविषयक) आणि विशेष काळजीयोग्य (हॅझार्डस) कचरा अशा चार वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये संकलित करून तो महापालिकेच्या घंटागाडीत स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच कचरा उघड्यावर टाकणे टाळावे व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवू नये, याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे.
“कचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण प्रक्रियेत मूळ स्तरावरील विलगीकरण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. घरातूनच कचरा स्वतंत्र केल्यास त्याची पुढील प्रक्रिया अधिक सुलभ आणि शास्त्रीय पद्धतीने करता येते. त्यामुळे नागरिकांनी चार-बिन पद्धतीचा अवलंब करून महापालिकेस सहकार्य करावे.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“कचरा विलगीकरणाची सवय प्रत्येक कुटुंबात रुजणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून नागरंशी प्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास त्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया अधिक परिणामकारकपणे करता येईल.”— कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“गृहभेटींच्या माध्यमातून चार प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन आणि घंटागाडीत कचरा देण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली जात आहे. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या भावनेतून सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.”— डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
ओला कचरा (हिरवा बिन) स्वयंपाकघरातील टाकऊ अन्न, फळे-भाज्यांचे अवशेष, चहाची पत्ती इत्यादी. सुका कचरा (निळा बिन) कागद, काच, प्लास्टिक, पुठ्ठे, धातूच्या वस्तू. सॅनिटरी कचरा (लाल/गुलाबी बिन) डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, वापरलेले कापूस, टिश्यू पेपर (वेष्टनात बांधून).
विशेष काळजीयोग्य कचरा (काळा/पिवळा बिन) ई-कचरा, औषधांच्या बाटल्या, सिरिंज, ट्यूबलाईट, एक्सपायर झालेली औषधे, पॉलिश/पेंटचे डबे.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ही मोहीम वेगाने राबवली जात असून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


