132
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एकूण ५५ लाखांची मदत; ॲन्टोनी लारा कंपनीकडून ४० लाख, महापालिकेकडून १० लाख अन् शासनाकडून ५ लाख!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार ‘ॲन्टोनी लारा रिन्युएबल्स’ कंपनीच्या वतीने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ॲन्टोनी लारा कंपनीकडून ४० लाख रुपये, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १० लाख रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून ५ लाख रुपये अशी एकूण ५५ लाख रुपयांची मदत मिळणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याशिवाय मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा वैद्यकीय विमा, मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचेही कंपनीने मान्य केले आहे.
या पत्रकार परिषदेस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, प्रभाग अध्यक्ष निखील बोऱ्हाडे, नगरसदस्य सचिन तापकीर, नगरसदस्या सारिका गायकवाड, रविंद्र गायकवाड, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि ॲन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मदत दिली जात आहे. ॲन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनी ४० लाख रुपये (यातून प्रत्येकी १० लाख रुपये सुपूर्द झाले असून, उर्वरित ३० लाख रुपये लवकरच मिळणार आहेत), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका १० लाख रुपये (७ मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत हस्तांतरित; २ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता सुरू), महाराष्ट्र शासन ५ लाख रुपये, एकूण मिळणारी मदत ₹ ५५ लाख प्रति कुटुंब.
महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे व सर्व लोकप्रतिनिधींनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेतले आहेत. मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा वैद्यकीय विमा (Medical Insurance) ॲन्टोनी लारा कंपनी उचलणार आहे.प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत नोकरी दिली जाईल. कुटुंबीयांच्या मागणीनुसार महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध करून देणे आणि ‘घरकुल योजने’तून निवासाची सोय करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
“मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचारी व त्यांचे नातेवाईक हे आमचेच कुटुंबीय आहेत. केवळ आर्थिक मदत देऊन थांबायचे नसून त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या माध्यमातून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत.”— प्रशांत शितोळे (सत्तारूढ पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
