‘शतप्रतिशत भाजपा’चा विचार घराघरांत पोहोचवा – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “भारतीय जनता पार्टी हा केवळ निवडणूक लढवणारा पक्ष नसून तो निरंतर राष्ट्रसेवेचे कार्य करणारा विचार आहे. देशात अडीच हजारांहून अधिक राजकीय पक्ष असले, तरी केवळ भाजपामध्येच शाश्वत कार्य निरंतर सुरू राहणार आहे. हाच ‘शतप्रतिशत भाजपा’चा विचार आता कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात पोहोचवून कमळ घरोघरी फुलवावे,” असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले.
भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा भव्य निवासी जिल्हा प्रशिक्षण वर्ग नुकताच लोणावळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या महाअभियानामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख व महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी सहभागी होत एकूण १२ विविध विषयांवर कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी भाजपाच्या स्थापनेपासूनचा गौरवशाली इतिहास दर्शवणारी एक भव्य प्रदर्शनी उभारण्यात आली होती. या प्रदर्शनीचे व प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी व पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात सध्या भाजपाचा सुवर्णकाळ सुरू आहे. अशा काळात कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांना ‘हवेहवेसे’ वाटतील असे काम केले पाहिजे. सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या कोणत्याही वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची प्रत्येकाने अत्यंत काळजी घेतली पाहिजे. गल्लीगल्लीत भाजपा दिसला पाहिजे आणि प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळणे आवश्यक आहे.
उद्घाटन सत्रानंतर पहिल्या दिवशी कार्यकर्त्यांना वैचारिक आणि संघटनात्मक पातळीवर सक्षम करण्यासाठी ७ विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते:
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी ‘व्यावहारिक सत्र’ घेत कामकाजाचे महत्त्व विषद केले. प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे यांनी पक्षाच्या ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.: विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी ‘कार्य विस्तार’ या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये यांनी आधुनिक ‘मीडिया व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ठाणे विधानसभेचे आमदार संजयजी केळकर यांनी भाजपाची ‘कार्य पद्धती’ या विषयावर सखोल प्रकाश टाकला. विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी ‘देशासमोरली आव्हाने’ या अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेशजी खणकर यांनी ‘कार्यकर्ता विकास संगोपन आणि जबाबदारीची जाणीव’ या विषयावर प्रभावी मांडणी केली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या ‘योगा व व्यायाम’ सत्राने झाली. यानंतर पुढील महत्त्वपूर्ण सत्रे पार पडली:
पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय संवादक योगेशजी बाचल यांनी ‘बूथ व्यवस्थापन, ६ स्थायी कार्यक्रम, मन की बात आणि SIR’ यावर धडे दिले, विधान परिषदेचे आमदार सुनीलजी कर्जतकर यांनी ‘भाजपा इतिहास’ या विषयावर सविस्तर मांडणी करत पक्षाच्या प्रवासाची माहिती दिली. पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘अंत्योदयातील संतृप्तता, मोदी सरकारच्या गरिबांसाठीच्या योजना व सरकारची कामगिरी’ यावर मार्गदर्शन केले. प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ‘सोशल मीडिया, AI, नमो app, saral app’ या आधुनिक तंत्रज्ञान विषयक सत्रात डिजिटल युगाचे तंत्र शिकवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड महानगरचे जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे यांनी ‘विचार परिवार’ या विषयावर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना वैचारिक दिशा दिली.
या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर आमदार चित्राताई वाघ, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा प्रभारी ॲड. भरत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, अभियान प्रमुख मोरेश्वर शेडगे, सदाशिव खाडे, संजय परळीकर, संजय पटणी, नगरसेवक राहुल कलाटे, अनुप मोरे, राजेश पिल्ले, विकास डोळस, वैशाली खाडे आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन जिल्हा प्रमुख व संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. त्यांना मधुकर बच्चे, संजय परळीकर, संजय पटणी, भूषण जोशी, अमेय देशपांडे आणि सचिन राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


