म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांचा मोठा दणका; हायवे कडेचे ६ अनधिकृत हातभट्टी दारू अड्डे जेसीबीच्या साहाय्याने केले नेस्तनाबूत!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
म्हाळुंगे: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी संपूर्ण शहरात धडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसी विभाग यांनी संयुक्तपणे एक अत्यंत आक्रमक कारवाई केली आहे. म्हाळुंगे आणि चाकण परिसरातील विविध ६ मोक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू विक्रीच्या अड्ड्यांवर थेट जेसीबी (JCB) फिरवून ही अनधिकृत बांधकामे कायमची नष्ट करण्यात आली आहेत.
दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना म्हाळुंगे परिसरातील ६ वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेले हातभट्टी दारू विक्रीचे अड्डे हे पूर्णपणे अनधिकृत जागेत बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले.
यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांनी तात्काळ एमआयडीसी विभागाशी अधिकृत पत्रव्यवहार करून हे अनधिकृत आणि बेकायदेशीर दारू विक्रीचे गाळे निष्कासित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, ११ जून २०२६ रोजी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग व एमआयडीसी विभाग यांच्या संयुक्त पथकाने मोठा फौजफाटा आणि जेसीबी घेऊन धडक कारवाई करत हे सर्व अड्डे जमीनदोस्त केले.
१) दुरेश रमेश राठोड – सिग्मा चौक, म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे. (अवैध दारू विक्रीचे अनधिकृत शेड नष्ट) २) लखन जडजा शिंदे – सिग्मा चौक, म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे. (अवैध हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त) ३) पुष्पादेवी शांतीलाल जाट – हिंदुस्तान पेट्रोल पंप, तळवडे ब्रिजजवळ, निघोजे, ता. खेड, जि. पुणे. (बेकायदेशीर बांधकाम भुईसपाट) ४) लखन हाजुरीया ठाकूर – डी. के. चौक, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे. (हातभट्टी दारू विक्रीचे ठिकाण नष्ट) ५) उदय अशोक कलाल – एच. पी. पेट्रोल पंपाजवळ, तळवडे रोड, पुणे. (अवैध मद्य विक्रीचे अनधिकृत शेड जमीनदोस्त) ६) सुश्मिता बंडू हितेज – सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड, जि. पुणे. (हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त)
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या अत्यंत आक्रमक आणि संयुक्त कारवाईमुळे म्हाळुंगे, चाकण व निघोजे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे हायवेच्या कडेला आणि औद्योगिक वसाहतींच्या मोक्याच्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून चालवले जाणारे अनधिकृत व्यवसाय बंद झाले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
सदरची धडाकेबाज कामगिरी पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. सारंग आवाड, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती श्वेता खेडकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत म्हाळुंगे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सचिन कदम, दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय धुमाळ व त्यांचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. दिवसे व त्यांचे पथक, आणि एमआयडीसी विभागाचे अधिकृत अधिकारी श्री. कडीले व त्यांच्या पथकाने संयुक्तपणे अत्यंत चोख कामगिरी बजावली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


