३६ हजार ५०० कोटींचा निधी, ५६ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा; ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सर्व शंकांचे सोप्या भाषेत निरसन
अमरावती प्रतिनिधी अविनाश वानखेडे, ३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती : सततचे नैसर्गिक संकट, अवेळी पाऊस आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या राज्यातील बळीराजाला पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेताना सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मनात अनेक तांत्रिक शंका, पात्रता-अपात्रतेचे निकष आणि अर्ज प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण होत आहेत.
शेतकऱ्यांमधील हा गैरसमज दूर व्हावा, त्यांना अचूक माहिती एकाच ठिकाणी मिळावी आणि या योजनेचा थेट ‘इफेक्ट’ प्रत्येक गरजू शेतकऱ्याच्या घरापर्यंत व्हावा, या पवित्र उद्देशाने सर्व अधिकृत माहिती गोळा करून ही सोपी प्रश्नोत्तरे (FAQ) तयार करण्यात आली आहेत.
कर्ज आणि पात्रतेविषयी महत्त्वाचे प्रश्न:
१. या कर्जमुक्ती योजनेचे स्वरूप नेमके काय आहे आणि कोणाला लाभ मिळणार?
-
उत्तर: या योजनेचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ असे असून, ती राज्यातील थकीत कर्ज असलेले आणि प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणारे, अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.
२. या योजनेत शेतकऱ्यांचे किती रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार?
-
उत्तर: पीक कर्जाची मुद्दल (Principal) आणि त्यावरील व्याज मिळून जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतची थकबाकी या योजनेत थेट माफ केली जाणार आहे.
३. कोणत्या कालावधीतील पीक कर्जाला ही माफी लागू आहे?
-
उत्तर: ज्या शेतकरी बांधवांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतले आहे, ज्यांची ही रक्कम ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत झाली होती आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत ती भरली गेली नाही, अशा सर्व कर्जांना ही थेट माफी मिळेल.
४. जर एखाद्या शेतकऱ्यावर २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असेल, तर तो या योजनेतून बाद होईल का?
-
उत्तर: अजिबात नाही. यासाठी शासनाने ‘एकवेळ समझोता’ (OTS) योजना आणली आहे. कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असल्यास, २ लाखांच्या वरील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्याला प्रथम बँकेत जमा करावी लागेल. ती रक्कम भरताच शासन तुमच्या कर्ज खात्यात २ लाख रुपये जमा करून खाते निरंक करेल.
५. दोन लाखांवरील अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्याला किती वेळ मिळणार आहे?
-
उत्तर: शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून शासनाने त्यांच्या हिश्श्याची (दोन लाखांवरील) रक्कम बँकेत भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मोठी मुदत दिली आहे.
६. ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि नियमित भरले आहे, त्यांना काय मिळणार?
-
उत्तर: प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने त्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंतचा थेट आर्थिक लाभ जाहीर केला आहे.
७. प्रोत्साहनपर लाभासाठी कोणत्या वर्षांची कर्जफेड ग्राह्य धरली जाईल?
-
उत्तर: सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत तुम्ही पीक कर्ज घेऊन ते ३० जून पूर्वी किंवा बँकेच्या मुदतीत पूर्ण भरले असल्यास, तुम्ही ५० हजारांच्या लाभासाठी पात्र ठराल. (यासाठी २०२५-२६ आणि २०२६-२७ ची कर्जेही वेळेत भरणे आवश्यक आहे).
८. नियमित कर्ज भरले आहे, पण कर्जाची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी होती, तर किती लाभ मिळणार?
-
उत्तर: अशा वेळी, तुम्ही जेवढी मुद्दल व व्याजाची रक्कम बँकेत जमा केली आहे तेवढीच पूर्ण रक्कम किंवा किमान ५,००० रुपये तुम्हाला प्रोत्साहन म्हणून दिले जातील.
९. कर्जमाफी मिळवण्यासाठी किती एकर जमीन असावी अशी काही मर्यादा आहे का?
-
उत्तर: नाही. या योजनेत जमीन धारणेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. अल्पभूधारक असो वा जास्त जमीन असलेला, सर्व पात्र शेतकऱ्यांना क्षेत्र मर्यादेशिवाय लाभ मिळेल.
१०. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याला कुठे रांगेत उभे राहून अर्ज करावा लागेल का?
-
उत्तर: नाही, तुम्हाला कुठेही लेखी किंवा ऑफलाईन अर्ज करायची गरज नाही. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. सर्व संबंधित बँका स्वतःहून पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती शासनाच्या पोर्टलवर थेट अपलोड करतील.
११. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणती तांत्रिक अट अनिवार्य आहे?
-
उत्तर: लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे आणि ‘ॲग्रीस्टॅक’ (Agristack) या सरकारी डिजिटल प्रणालीवर आपली शेती व वैयक्तिक नोंदणी असणे अत्यंत अनिवार्य आहे.
१२. जर एखाद्या शेतकऱ्याची ‘ॲग्रीस्टॅक’मध्ये नोंदणी नसेल, तर त्याचे काय होणार?
-
उत्तर: नोंदणी नसल्यामुळे कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. अशा शेतकऱ्यांसाठी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि महसूल विभाग विशेष मोहीम राबवून प्रथम नोंदणी करून घेईल आणि त्यानंतरच लाभ दिला जाईल.
१३. या योजनेचा लाभ कोणत्या व्यक्तींना किंवा घटकांना मिळणार नाही?
-
उत्तर: आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी सदस्य. तसेच २५ हजार रुपयांपेक्षा जास्त पगार किंवा पेन्शन घेणारे सरकारी व निमसरकारी कर्मचारी आणि शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्नावर इन्कम टॅक्स (आयकर) भरणारे नागरिक या योजनेस अपात्र ठरतील.
-
विशेष सवलत: सहकारी साखर कारखान्यातील संचालक अपात्र असले, तरी तिथल्या ‘हंगामी कामगारांना’ (Seasonal Workers) या अपात्रतेतून वगळण्यात आले आहे, त्यामुळे कामगार शेतकरी बांधवांना लाभ मिळेल.
१४. पात्र शेतकऱ्यांची यादी कुठे पाहता येईल आणि पैसे कसे मिळणार?
-
उत्तर: शासनाकडून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एक विशेष युनिक क्रमांक (Unique ID) दिला जाईल. ही यादी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. लाभाची रक्कम थेट डीबीटी (DBT) द्वारे थेट बँक कर्जखात्यात जमा होणार असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होत आहे.
१५. जर यादीत नाव नसेल किंवा रकमेबाबत तफावत असेल, तर दाद कुठे मागावी?
-
उत्तर: कोणत्याही तक्रारीचे जागेवरच निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हाधिकारी’ (District Collector) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यादीतील त्रुटी सुधारण्याची जबाबदारी या समितीची असेल.
१६. या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्यामागचे कारण काय?
-
उत्तर: यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी (३०० वे) जयंती वर्ष आहे. त्यांनी त्यांच्या काळात शेती, विहिरी-बारवांची निर्मिती, जलसिंचन आणि ग्रामीण विकासासाठी ऐतिहासिक काम केले होते. त्यांच्या याच आदर्श कार्याला व स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या कल्याणकारी योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
