पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच लागू होणार सर्वसमावेशक ‘शौचालय धोरण’; स्थायी समितीच्या बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांची मंजुरी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येच्या तुलनेत निर्माण होणाऱ्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वसमावेशक असे ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शौचालय धोरण’ तयार करण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या धोरणाला अधिकृत मान्यता दिली. हे धोरण महापालिका स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर आता अंतिम मान्यतेसाठी महापालिका सर्वसाधारण सभेपुढे सादर केले जाणार आहे.
शहरातील सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे धोरण आखण्यात आले आहे. बाजारपेठा, वाहतूक केंद्रे, उद्याने, धार्मिक स्थळे, झोपडपट्ट्या आणि प्रमुख रस्त्यांवरील सद्यस्थितीचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी नागरिकांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन सुलभ शौचालय व्यवस्था निर्माण केली जाईल. स्थान निश्चिती, नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा, मलनिसारण व्यवस्था, विद्युत व्यवस्था, पुरेशी प्रकाशयोजना आणि सुरक्षेचे नियोजन केले जाईल.दिव्यांगांसाठी सुलभ (Accessible) प्रवेश व्यवस्था तसेच माता व बालकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध असतील. सर्व शौचालयांचे डिजिटल मॅपिंग केले जाईल, तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली जाईल आणि देखभालीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. आवश्यकतेनुसार पीपीपी मॉडेलद्वारे स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन केले जाईल.
“पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहराच्या वाढत्या विस्तारानुसार नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. आरोग्य विभागाने तयार केलेले हे ‘शौचालय धोरण’ भविष्यातील गर्दीची ठिकाणे व वस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सोयीचा यात विशेष विचार करण्यात आला असून स्थायी समितीने या धोरणाला मंजुरी दिली आहे.”
— अभिषेक बारणे, सभापती (स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

