news
Home पिंपरी चिंचवड किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तातडीने ताबा द्या आणि महापालिकेच्या चुकीचा आर्थिक भुर्दंड नागरिकांवर टाकू नका; काशिनाथ नखाते आक्रमक

किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तातडीने ताबा द्या आणि महापालिकेच्या चुकीचा आर्थिक भुर्दंड नागरिकांवर टाकू नका; काशिनाथ नखाते आक्रमक

किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तात्काळ घरांचा ताबा द्या; कष्टकरी संघर्ष महासंघाचा महापालिकेवर धडक मोर्चा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

घरांसाठी महानगरपालिकेवर कष्टकरी संघर्ष महासंघाचा भव्य ‘घर हक्क मोर्चा’; शिष्टमंडळाला चर्चेस न बोलावल्याने आंदोलक घुसले महापालिकेत!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून १० हजार नवीन घरांची निर्मिती करण्यात यावी, किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तात्काळ घरांचा ताबा मिळावा आणि महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य कष्टकऱ्यांवर टाकू नये, या प्रमुख मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी येथे भव्य ‘घर हक्क मोर्चा’ काढण्यात आला. या आंदोलनात शेकडो लाभार्थी, कामगार आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेला हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला. मात्र, महापालिका आयुक्त व प्रशासनाने शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यास टाळाटाळ केल्याने वातावरण प्रचंड तापले. संतापलेल्या आंदोलकांनी थेट महापालिकेचे मुख्य गेट ढकलून आत प्रवेश केला आणि पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आंदोलकांचा हा आक्रमक पवित्रा पाहून अखेर महापालिका प्रशासनाची पळापळ झाली.

आंदोलनाला संबोधित करताना काशिनाथ नखाते म्हणाले की, महापालिकेने २०२० मध्ये रावेत येथे ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत ६ लाख ९५ हजार रुपयांत घरे देण्याचे जाहीर केले होते. मात्र, पालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे ती जागा ताब्यात घेता आली नाही आणि लाभार्थ्यांना किवळे येथील प्रकल्पात तब्बल १३ लाख रुपयांना घरे स्वीकारण्यास भाग पाडले गेले.
“किवळे गृहप्रकल्पाची सोडत १५ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. मात्र, ८ महिन्यांहून अधिक काळ उलटूनही घरांचा ताबा मिळालेला नाही. उलट, ताबा नसतानाही गरीब लाभार्थी गेल्या ४-५ महिन्यांपासून बँकेचे कर्जाचे हप्ते भरत आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांवर आर्थिक व मानसिक अत्याचार सुरू आहे. त्यामुळे ही नक्की आवास योजना आहे की भास योजना?”
— काशिनाथ नखाते (अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ)

आंदोलकांच्या मुख्य मागण्या  –
 किवळे गृहप्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना तात्काळ घरांचा ताबा द्यावा.  महापालिकेच्या चुकीमुळे ताबा मिळण्यास झालेल्या विलंबाचा आर्थिक भार लाभार्थ्यांवर न टाकता, ताबा मिळेपर्यंतचे बँक कर्जाचे हप्ते महापालिकेने भरावेत.  नोंदणी प्रक्रियेतील मुद्रांक शुल्क (Stamp Duty) पूर्णपणे माफ करावे.  शहरात सर्वसामान्यांसाठी १० हजार नवीन घरांची निर्मिती करावी आणि सर्व पायाभूत सुविधा पुरवाव्यात.

आंदोलकांच्या तीव्र पवित्र्यानंतर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि अण्णा बोदडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुद्रांक शुल्क माफीबाबत सकारात्मक प्रक्रिया सुरू असून, उद्या (शुक्रवारी) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन घरांचा ताबा व इतर मागण्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जंगम यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या मोर्च्यात चेतन गायकवाड, राजेश माने, कान्हाभाऊ व्हरकटे, अमृत पाटील, सखाराम केदार, शुभांगी चव्हाण, आशा जाधव, भागवत नागपुरे, अंगद मुंगळे, प्रीती गोहाड, विकी भाट, जितेंद्र महाजन यांच्यासह शेकडो नागरिक व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!