35
सफाई कामगारांच्या श्रमांचा सन्मान करणाऱ्या ‘अवकारिका’ चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर व पोस्टरचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अनावरण!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: स्वच्छ शहराच्या निर्मितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचे कष्ट, त्यांचे शहरवासियांप्रती असलेले योगदान आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी अधोरेखित करणाऱ्या ‘अवकारिका’ या सामाजिक आशयाच्या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर व पोस्टरचे भव्य अनावरण पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छ भारत मिशनच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या योगदानाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे.
या अनावरण सोहळ्यास नगरसदस्या सारिका मासुळकर, अभिनेता रोहित पवार, दिग्दर्शक सीए अरविंद भोसले, निर्माते भरत टिळेकर व अरुण जाधव यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शहर स्वच्छ दिसावे, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी सफाई कामगार प्रतिकूल परिस्थितीत दररोज काम करतात. मात्र, त्यांच्या या श्रमांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. या अदृश्य श्रमांना समाजासमोर आणून सफाई कामगारांप्रती आदराची भावना निर्माण करणे आणि ‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’ हा विचार रुजवण्याचा प्रयत्न ‘अवकारिका’द्वारे करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, चित्रपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले आणि त्यांच्या टीमने केवळ पडद्यावर संदेश न देता प्रत्यक्ष अजमेरा येथील एका उद्यानाची स्वच्छता व सुशोभीकरण करून त्याचा कायापालट केला आहे. चित्रपटातील संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याच्या या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“सकाळी घराबाहेर पडताना दिसणाऱ्या स्वच्छ रस्त्यांमागे अनेक सफाई कामगारांचे अथक परिश्रम असतात. त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे म्हणजे आपण स्वतः कचरा न करणे होय. ‘माझे शहर स्वच्छ ठेवणे ही माझीही जबाबदारी आहे’ ही भावना प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराच्या मनात निर्माण झाली पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांकडे केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर शहराच्या आरोग्याचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून पाहिले पाहिजे.”— रवि लांडगे, महापौर (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
महापौर लांडगे यांनी नागरिकांना आवाहन केले की, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे यांसारख्या छोट्या कृतींतून पिंपरी-चिंचवडला अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यासाठी या चळवळीत सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

