30
अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ऑगस्टला निघणार ‘जनआक्रोश महामोर्चा’!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : अनुसूचित जातीतील (SC) आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या आणि वंचितांपर्यंत पोहोचावा तसेच आरक्षणाचा योग्य व न्याय्य वाटा सर्व घटकांना मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ‘अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती’ (पिंपरी-चिंचवड शहर व पुणे ग्रामीण) च्या वतीने मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘जनआक्रोश महामोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या महामोर्चाला अनुसूचित जातीतील ५८ घटकांचा/जातींचा पूर्ण पाठिंबा असून, संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळणे गरजेचे आहे. ज्या घटकांपर्यंत आजही आरक्षणाचा अपेक्षित लाभ पोहोचलेला नाही, त्यांना योग्य वाटा मिळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे, अशी स्पष्ट भूमिका समर्थन कृती समितीने मांडली आहे.
आरक्षण उपवर्गीकरणाला काही संघटनांकडून विरोध होत असला, तरी उपवर्गीकरणाचा हेतू कोणाचेही आरक्षण हिरावून घेणे हा नसून, ते अधिक गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवणे हाच आहे, असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
-
दिनांक व वेळ: मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
-
प्रारंभ: आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड स्टेशन.
-
मार्ग व सांगता: चिंचवड स्टेशनवरून निघून हा महामोर्चा निगडीच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि निगडी येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चाची सांगता होईल.
महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे केली जाणार आहे. या न्याय्य हक्काच्या लढ्यात अनुसूचित जातीतील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि बहुसंख्य घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे भावुक आवाहन आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

