43
राजस्थानपर्यंत मागोवा घेत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २.१४ कोटींच्या डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: डिजिटल अरेस्ट आणि बनावट पोलीस नोटीस देऊन एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची २ कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल ९ महिन्यांच्या अथक तपासांनंतर पोलिसांनी राजस्थानमधून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. राजेंद्र गणराज नागर (वय ३२ वर्षे, रा. जलखोडा, ता. नैनवा, जि. बूंदी, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पीडित सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. पीडित व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांमध्ये ‘पीएफआई’ (PFI) या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित पैसे जमा झाल्याची भीती घालून आरोपींनी बनावट पोलीस कागदपत्रे व नोटिसा पाठवल्या. रक्कम पडताळणीनंतर परत केली जाईल असे सांगून आरोपींनी पीडिताच्या विविध बँक खात्यांमधील आणि एफडीमधील एकूण २ कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपये स्वतःच्या विविध खात्यांत वर्ग करून घेतले. याप्रकरणी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान आरोपीने फसवणुकीची रक्कम मिळवण्यासाठी आयसीआयसीआय आणि बँक ऑफ बडोदाच्या ६ विविध खात्यांचा वापर केल्याचे समोर आले. आरोपी राजेंद्र नागर याच्या ‘M/s Sultan Construction and Material Suppliers’ या खात्यात फसवणुकीचे लाखो रुपये जमा झाले होते आणि त्याने स्वतः बँकेत जाऊन धनादेशाद्वारे ही रक्कम काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले.
नोटीस पाठवूनही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता आणि मोबाईल बंद ठेवून तपासाची दिशा भरकटवत होता. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि सीडीआरच्या मदतीने आरोपी राजस्थानमधील बूंदी जिल्हयातील लाखेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवून आरोपी राजेंद्र नागर याला ८ ऑगस्ट २०२६ रोजी अटक केली.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, प्रकाश कातकडे तसेच अमंलदार दिपक भोसले, सुभाष पाटील, विनायक म्हसकर, दिपक माने, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड आणि महिला अंमलदार ज्योती साळे यांच्या पथकाने केली.
गुन्ह्यातील इतर साथीदार व आर्थिक व्यवहारातील मुख्य सूत्रधारांचा शोध पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
