8
हरित ऊर्जेकडे आणखी एक पाऊल; आधुनिक आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वाटचाल!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहरातील पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासह इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या विद्युत वाहन (EV) चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
शहराची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून हरित ऊर्जेचा स्वीकार केला जात आहे. महापालिका मुख्यालयात कार्यान्वित करण्यात आलेले हे EV चार्जिंग स्टेशन पिंपरी-चिंचवडला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहर बनवण्याच्या दिशेने टाकलेले अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
“विकास म्हणजे केवळ नवीन रस्ते, इमारती किंवा पायाभूत सुविधा उभारणे नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ हवा आणि निरोगी पर्यावरण निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर आणि त्यासाठी सक्षम चार्जिंग नेटवर्कची निर्मिती ही काळाची गरज आहे. भविष्यात हरित ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”— रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड)
“पिंपरी-चिंचवडच्या वेगवान विकासासोबत शहराच्या पर्यावरणीय गरजांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग सुविधांचा विस्तार ही भविष्यातील शाश्वत शहरासाठी केलेली महत्त्वाची गुंतवणूक आहे. या उपक्रमामुळे शहरातील हरित वाहतुकीला निश्चितच अधिक चालना मिळेल.”— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका)
या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, ‘क’ प्रभाग समिती अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुविधेमुळे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये ई-वाहनांच्या वापराबाबत मोठी जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

