12
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते रिक्षा फिडर सेवेचा शुभारंभ; मेट्रो प्रवाशांचा पुढील प्रवास होणार सुलभ!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, किफायतशीर आणि नागरिकांसाठी सोयीची करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महामेट्रो आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बहुप्रतिक्षित ‘रिक्षा फिडर सेवेचा’ भव्य शुभारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते या सेवेचे उद्घाटन पार पडले.
या उपक्रमामुळे मेट्रो आणि रिक्षा सेवा एकमेकांशी जोडल्या जाऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, शिवाय पार्किंगची समस्या कमी होऊन मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांचे भाडे नाकारू नये (No Refusal Policy), मीटरप्रमाणे किंवा शेअरिंग पद्धतीने सेवा द्यावी, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.
प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा शेअरिंग आणि मीटर अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, सुरुवातीच्या टप्प्यात २० मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. गेट क्र. १ घरकुल प्रकल्प, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली गाव, अजमेरा कॉलनी, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट, शाहूनगर, गेट क्र. २ अंथिया सोसायटी, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, अंतरिक्षा कॉलनी, खराळवाडी, मोनिका अपार्टमेंट, डी. वाय. पाटील कॉलेज, गेट क्र. ३ पिंपरी गाव, चिंचवडगाव, तापकीर नगर, वाल्हेकरवाडी, निगडी, डिलक्स चौक, काळेवाडी ब्रिज, साई चौक, चाफेकर चौक.
“रिक्षाचालक हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. प्रवाशांना शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी रिक्षाचालकांची आहे. रिक्षा स्थानकांवर लवकरच ‘ई-चार्जिंग’ सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.” – महापौर रवि लांडगे
“मेट्रोमधून उतरल्यानंतर प्रवाशाला सहज रिक्षा मिळाली तर मेट्रो व रिक्षा या दोन्ही सेवांवरील नागरिकांचा विश्वास वाढेल. याचा फायदा प्रवासी आणि चालक दोघांनाही होईल.” – महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रावण हर्डीकर
“मेट्रो स्थानकापासून इच्छित स्थळी जाण्यासाठी विश्वासार्ह सुविधा देणे आवश्यक होते. यशस्वितेनंतर या सेवेचा शहरातील इतर भागांतही विस्तार केला जाईल.” – महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
“या उपक्रमातून पुरुष व महिला रिक्षाचालकांना सन्मानजनक रोजगार मिळणार असून भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाईल.” – बाबा कांबळे (अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत)

या कार्यक्रमास आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, तुषार हिंगे, शहर अभियंता मनोज सेठिया, महामेट्रोचे व्यवस्थापक कॅप्टन सनेर पाटील, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संयोजक शुभम तांदळे, विजय ढगारे, विशाल ससाने, धनंजय कुदळे, दीपक ताटे, सूरज सोनवणे, दत्ता गिल्ले, भाऊसाहेब शेलार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

