47
‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ म्हणीला छेद; तब्बल १२ वर्षांनंतर अखेर बँकेकडून मिळाली गृहकर्जाची एन.ओ.सी.!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही प्रचलित म्हण आपण अनेकदा ऐकतो किंवा अनुभवतो. शासकीय असो वा निमशासकीय कार्यालये, कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात असा सार्वत्रिक अनुभव असतो. मात्र, जुनी सांगवी (पुणे) येथील रहिवासी सुनील मधुकर पोकरे यांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या बाबतीत आलेला एक सकारात्मक व कौतुकास्पद अनुभव सध्या चर्चेत आला आहे. तब्बल १२ वर्षांनंतरही अत्यंत संयमाने पाठपुरावा केल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी जुनी फाईल शोधून देत त्यांना गृहकर्जाची ‘एन.ओ.सी.’ (NOC) व मूळ कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.
सुनील पोकरे यांनी २००६ मध्ये नवीन फ्लॅट खरेदीसाठी तत्कालीन ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’कडून गृहकर्ज घेतले होते. १६ ते १७ वर्षांची मुदत असतानाही व्याजाचा भार कमी करण्यासाठी त्यांनी २०१४ मध्येच (अवघ्या ८ वर्षांत) सर्व कर्जाची परतफेड करून बँक कर्जमुक्त केली होती. मात्र, व्यस्ततेमुळे किंवा अनवधानाने कर्जाची ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) आणि मूळ कागदपत्रे बँकेकडून ताब्यात घेणे बाकी राहिले होते.
तब्बल १२ वर्षांनंतर पोकरे जेव्हा बँकेच्या शाखेत पोहोचले, तेव्हा तेथे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ऐवजी नवीन दुकाने दिसत असल्याने त्यांची चिंता वाढली. मात्र, चौकशीअंती या बँकेचे ‘पंजाब नॅशनल बँक’ (PNB) मध्ये विलीनीकरण झाल्याचे स्पष्ट झाले.
पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन पोकरे यांनी अर्ज सादर केला. १२ वर्षांपूर्वीची जुनी फाईल असल्याने ती तात्काळ शोधणे आव्हानात्मक होते. पहिल्या दिवशी तासभर शोध घेऊनही फाईल न सापडल्याने पोकरे काहीसे निराश झाले. मात्र, बँक व्यवस्थापकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना दोन दिवसांचा वेळ मागितला.
दोन दिवसांनंतर जेव्हा पोकरे पुन्हा बँकेत गेले, तेव्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करत त्यांची संपूर्ण जुनी फाईल शोधून काढली होती. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँकेने पोकरे यांच्या स्वाधीन सर्व मूळ कागदपत्रे आणि एन.ओ.सी. सुपूर्द केली.
“एखादे काम उशिरा झाले म्हणून ते होणारच नाही असे नसते. बँकेच्या व्यवस्थापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता खरोखर कौतुकास्पद आहे. संयम आणि चिकाटी ठेवली तर अनेक वर्षांनंतरही आपले हक्काचे काम पूर्ण होते, हाच विश्वास या प्रसंगाने दिला.”— सुनील मधुकर पोकरे (रहिवासी, जुनी सांगवी)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
