106
‘जे शिकतात ते व्यवस्था बदलतात’ — मानव कांबळे!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: सरकारी शाळांची बिघडत चाललेली परिस्थिती, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार आणि खासगी शाळांकडून होणारी बेकायदेशीर फी वाढ व डोनेशनची लूट याविरोधात छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ‘शिक्षण हक्क परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “दर्जेदार आणि मोफत शिक्षण देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, शिक्षणाचे खासगीकरण करून बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जात आहे. कारण जे शिकतात ते सत्तेला प्रश्न विचारतात आणि व्यवस्था बदलतात, हेच सरकारला नको आहे.”
छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी खासगी शाळांच्या लुटीवर तीव्र संताप व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने कठोर पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये ‘एनसीईआरटी’चा (NCERT) अभ्यासक्रम त्वरित लागू करावा. बेकायदेशीर डोनेशन आणि अवाजवी फी वाढ घेणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी. ठराविक ठिकाणाहूनच शालेय साहित्य घेण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई व्हावी. डिजिटल साधने, प्रयोगशाळा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि फर्निचरबाबत सर्व शाळांमधील असमानता दूर करावी. शिक्षकांवर अध्यापनाव्यतिरिक्त टाकण्यात येणारा मतदार यादी, सर्वेक्षण आणि ऑनलाइन माहितीचा अतिरिक्त भार त्वरित थांबवावा. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून द्यावी. केवळ इमारतींवर खर्च न करता ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि शिक्षकांच्या गुणवत्तेवर सातत्यपूर्ण गुंतवणूक करावी. शाळांमधील रिक्त शिक्षक पदे विलंब न लावता त्वरित भरावीत. अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई करून तेथील विद्यार्थ्यांचे इतर अधिकृत शाळांमध्ये विनामूल्य समायोजन करावे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने डीबीटी (DBT) प्रक्रिया तात्काळ राबवावी आणि आरटीई (RTE) अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून साहित्य किंवा उपक्रमांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या शाळांवर कारवाई करून शासनाचे अनुदान त्वरित वितरित करावे.
या परिषदेस आरटीई (RTE) पालक संघाचे हेमंत मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, छावाचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष गोरख पाटील, शिक्षण हक्क परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीन कदम, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, कामगार नेते प्रल्हाद कांबळे, प्रदेश उपाध्यक्षा अश्विनी पाटील, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत जाधव, गोविंद पवार, परिषदेचे उपाध्यक्ष संतोष बोरचटे, विष्णू बिरादार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब पाटील, पुणे पूर्व जिल्हाध्यक्षा प्रणिता पिंपरीकर, प्रतीक्षा गंगावणे, गजानंद बिरादार, मंजुषा येळकर, अनुसया जाधव, मंगल शिंदे, रावसाहेब गंगाधरे, अमित मोरे, आकाश खडके, राजकुमार भोसले, अनिता बिराजदार, पुणे शहराध्यक्ष विजय कारकर यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

