news
Home पिंपरी चिंचवड स्वतःच्या मुख्यालयात पाणी देण्यास असमर्थ ठरणाऱ्या प्रशासनावर नागरिकांचा तीव्र संताप; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यक्षमतेवर उठले प्रश्नचिन्ह

स्वतःच्या मुख्यालयात पाणी देण्यास असमर्थ ठरणाऱ्या प्रशासनावर नागरिकांचा तीव्र संताप; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यक्षमतेवर उठले प्रश्नचिन्ह

पिंपरी महापालिका मुख्यालयातील अस्वच्छ व विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त; आयुक्तांच्या कारभारावर प्रश्न | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; मुख्यालयातच पिण्याच्या पाण्याची वानवा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: संपूर्ण शहराला दररोज लाखो लिटर पाणी पुरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतच गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचे भीषण सावट पसरले आहे. महापालिका मुख्यालयामध्ये गेल्या १८ ऑगस्टपासून दररोज सकाळी १० वाजेपर्यंत पिण्याचे आणि वापराचे पाणीच उपलब्ध होत नसल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, तासनतास वाट पाहिल्यानंतर जो पाणीपुरवठा होतो, ते पाणीदेखील अतिशय अस्वच्छ आणि गडूळ असल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिक व कर्मचाऱ्यांमधून जोरदार ताशेरे ओढले जात आहेत.

महानगरपालिका मुख्यालयात दररोज विविध प्रशासकीय कामांसाठी हजारो नागरिक येत असतात. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंत नळांना पाणीच येत नसल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तसेच मनपा कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने आरोग्यविषयक प्रश्न गंभीर बनले आहेत.
अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा नळांमध्ये पाणी सुरू होते, तेव्हा ते पाणी पिण्यायोग्य नसून अत्यंत दूषित आणि गडूळ असते. महापालिकेच्या इमारतीतच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

“संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियंत्रण आणि नियोजन करणाऱ्या मुख्य कार्यालयाचीच जर अशी दयनीय अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची काय गत होत असेल?” असा थेट आणि परखड सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, शहरातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे सातत्याने विविध बैठका आणि उपाययोजनांचे दावे करत आहेत. मात्र, स्वतःच्या नाकाखाली असलेल्या महापालिका मुख्यालयातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात प्रशासनाला पुरते अपयश आल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यक्षमतेवर आणि प्रशासकीय पकडीवर नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन मुख्यालयातील पाणीपुरवठा वेळेवर व सुरळीत करावा आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!