2
अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती द्या: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच अनधिकृत टपऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करून निष्कासनाची मोहीम जलद गतीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले आहेत. कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता सुनील बागवानी, सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षक उपस्थित होते.

प्रत्येक बीट निरीक्षकाने आपल्या क्षेत्राची नियमित पाहणी करावी. नव्याने सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून तातडीने निष्कासनाची कारवाई करावी. महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत टपऱ्यांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय सार्वजनिक पदपथांवरील (Footpaths) अतिक्रमणे हटवून ते नागरिकांच्या वापरासाठी मोकळे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. केवळ तक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतःहून क्षेत्रात गस्त घालून अनधिकृत बांधकामे शोधून काढून त्यावर तातडीने निष्कासन मोहीम राबवावी. निष्कासन कारवाईसाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व सुरक्षेचे योग्य नियोजन करून मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
“पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर सातत्याने आणि प्रभावीपणे कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. बीट निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून नव्याने होणारी अनधिकृत बांधकामे तातडीने निदर्शनास आणून त्यावर नियमानुसार निष्कासनाची कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे, अनधिकृत टपऱ्या तसेच पदपथांवरील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्यात येत आहेत. या कामात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून हलगर्जीपणा झाल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
