35
पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा, कॉलेज परिसरातील १९ पान टपऱ्यांवर पोलिसांचा हातोडा! परिमंडळ-१ अंतर्गत महापालिकेच्या मदतीने धडक कारवाई
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिघात बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटची विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ-१ कडून धडक कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मदतीने व कडक पोलीस बंदोबस्तात एकूण १९ टपऱ्यांचे निष्कासन (हटाव मोहीम) करण्यात आले.
पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली यांनी शाळा परिसरातील जंकफूड व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.

निगडी पोलीस ठाणे ०३ टपऱ्यांवर कारवाई, चिंचवड पोलीस ठाणे ०२ टपऱ्यांवर कारवाई, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे ०६ टपऱ्यांवर कारवाई, दापोडी पोलीस ठाणे ०३ टपऱ्यांवर कारवाई, सांगवी पोलीस ठाणे ०५ टपऱ्यांवर कारवाई एकूण १९ टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आणि विशेषतः तरुण विद्यार्थ्यांच्या आरोग्याला व सुरक्षेला प्राधान्य देत, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारची धडक मोहीम यापुढेही नियमित व प्रभावीपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-१) श्री. संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त (सांगवी विभाग) मनीषा कदम, सहायक पोलीस आयुक्त (पिंपरी विभाग) श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे (निगडी), दत्तात्रय चासकर (चिंचवड), सुहास आव्हाड (संत तुकाराम नगर), गोरख कुंभार (दापोडी), जितेंद्र कोळी (सांगवी) व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
