news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये संगीताची भव्य मेजवानी; गानसम्राज्ञी श्रेया घोषाल यांना ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ प्रदान होणार!

पिंपरी-चिंचवडमध्ये संगीताची भव्य मेजवानी; गानसम्राज्ञी श्रेया घोषाल यांना ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ प्रदान होणार!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा उपक्रम; 'आशा से श्रेया तक' कार्यक्रमासह नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर; भाऊसाहेब भोईर यांच्या पुढाकाराने चिंचवडमध्ये भव्य सोहळा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय आणि अलौकिक योगदान देणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्याची समृद्ध परंपरा जपणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या पुढाकाराने यावर्षीचा २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ५ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडणार असल्याची माहिती भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड शहराला केवळ औद्योगिक ओळख न ठेवता त्याला समृद्ध सांस्कृतिक आणि कलात्मक परिमाण मिळवून देण्यात भाऊसाहेब भोईर यांचा मोलाचा वाटा आहे. सन २००२ पासून सलग २१ वर्षे राष्ट्रीय स्तरावरील ‘आशा भोसले पुरस्कार’ सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून त्यांनी पिंपरी-चिंचवडचे नाव कला व संगीत विश्वात उंचावले आहे.
यापूर्वी गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान यांसारख्या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र निवड समितीने यंदा श्रेया घोषाल यांची या पुरस्कारासाठी एकमुखाने निवड केली आहे.

 रु. १,११,०००/- (एक लाख ११ हजार रुपये) रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह,  विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष कार्यक्रम रंगणार असून, गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल.

हा संपूर्ण सोहळा सर्व संगीतप्रेमी व नागरिकांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तमाम रसिकांनी या सांगीतिक मेजवानीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सह कोषाध्यक्ष संतोष शिंदे आणि सदस्य सुदाम परब उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!