news
Home पिंपरी चिंचवड नागरिक अन् महिला विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; पिंपरी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे भोसरीत असंतोष!

नागरिक अन् महिला विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; पिंपरी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे भोसरीत असंतोष!

खराब साहित्य ४ दिवसांत न हटवल्यास आयुक्तांकडे तक्रार करण्याचा प्रदीप गायकवाड यांचा कडक इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) परिसरातील साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ह’ क्षेत्रीय कार्यालयाला इशारा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेले साहित्य इमारतीच्या मधल्या जागेत जैसे थे पडून आहे. हे साहित्य पावसाच्या पाण्याने सतत भिजत असल्याने परिसरात अक्षरशः दुर्गंधी पसरली असून, डासांची मोठी उत्पत्ती सुरू झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (कै. अजितदादा पवार) प्रदीप गायकवाड यांनी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. पूजा दूधनाळे यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि स्वाईन फ्ल्यू यांसारख्या साथीच्या आजारांचे विषाणू मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अशा धोकादायक परिस्थितीत महापालिका प्रशासनाने सतर्क राहणे अपेक्षित असताना, आरोग्य विभागाचे या दुर्दैवी परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात दररोज विविध प्रशासकीय कामांसाठी शेकडो नागरिक येत असतात. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या संख्येने महिला वर्ग, विद्यार्थिनी आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित असतात. या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.  महिन्याभरापासून भिजलेल्या अवस्थेत पडून असलेल्या साहित्यामुळे डासांची उत्पत्ती केंद्र तयार झाले आहे. परंतु, महापालिकेचा स्थानिक आरोग्य विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नाही. हे खराब आणि दुर्गंधीयुक्त साहित्य येत्या चार दिवसांत या परिसरातून तात्काळ न उचलल्यास, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे थेट निवेदन देऊन तक्रार करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रदीप गायकवाड यांनी दिला आहे.
शहरभरात डास प्रतिबंधक मोहिमा राबवण्याचे दावे केले जात असताना, स्वतः महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय व शैक्षणिक संस्थेच्या आवारातच अशी अस्वच्छता पसरल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता तरी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा दूधनाळे यावर तातडीने कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!