28
पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा; नागरिककेंद्री नियोजनावर महापौर रवि लांडगे यांचा भर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि नागरी व्यवस्थापन अधिक सक्षम, आधुनिक व नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शहराच्या दीर्घकालीन विकासाचे नियोजन करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यात यावी. तसेच नगरसदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यानुसार योजनांमध्ये आवश्यक सुधारणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.
ऑगस्ट महिन्यातील महापालिका सभेमध्ये सुचविल्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प व धोरणांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महामेट्रो फेज-२ अंतर्गत निगडी ते चाकण मार्गिका, ईआरटीएस (ERTS) बस सेवा, वाहन पार्किंग धोरण आणि सार्वजनिक शौचालय धोरण या विषयांचा समावेश होता.
आज झालेल्या सादरीकरणास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, शिक्षण समिती सभापती रवीना अंगोळकर, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, तृप्ती कांबळे, आरती चौंधे, अर्चना सस्ते, अर्चना करांडे, शिवानी नरळे, सविता खुळे, नगरसदस्य योगेश बहल, विठ्ठल काटे, सागर गवळी, सुलभा उबाळे, श्रुती वाकडकर, शाम जगताप, जालिंदर शिंदे, राजश्री लांडगे, योगेश लांडगे, विराज लांडे, नितीन लांडगे, डॉ. सुहास कांबळे, वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर, सोनम मोरे, नितीन काळजे, सचिन तापकीर, श्रुती डोळस, कृष्णा सुरकुले, शैलजा मोरे, अमित गावडे, धर्मपाल तंतरपाळे, निलेश तरस, आशा सूर्यवंशी, पल्लवी वाल्हेकर, विकास साने, यश साने, शेखर चिंचवडे, अनंता कोऱ्हाळे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, रिटा सानप, योगिता नागरगोजे, निलेश नेवाळे, पंकज भालेकर, अरुणा लंगोटे, वर्षा जगताप, संदीप वाघेरे, प्रियंका कुदळे, शालिनी गुजर, माया बारणे, शितल वर्णेकर, अनिल घोलप, रेश्मा भुजबळ, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, अर्चना तापकीर, अनिता काटे, कुंदा भिसे, शकुंतला धराडे, शशिकांत कदम, नीता पाडाळे, कोमल काळे तसेच शहर अभियंता मनोज सेठीया, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित महामेट्रो फेज-२ अंतर्गत निगडी ते चाकण मार्गिकेचे सादरीकरण करताना महापौर म्हणाले, “मेट्रो हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून शहराच्या पुढील अनेक दशकांच्या विकासाची दिशा ठरविणारा प्रकल्प आहे. पिंपरी-चिंचवडमधील निवासी व व्यावसायिक भागांना चाकण औद्योगिक पट्ट्याशी जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून नगरसदस्यांनी मांडलेल्या व्यवहार्य सूचनांचा नियोजनात समावेश करून कामाला गती द्यावी.”
शहरात ईआरटीएस बस सेवा सुरू करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्ग निश्चित करताना केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता औद्योगिक कामगार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
व्यापारी क्षेत्र व गर्दीच्या ठिकाणी पार्किंग धोरण हे नागरिकांना त्रास देणारे नव्हे, तर त्यांची समस्या सोडविणारे असले पाहिजे. धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी स्थानिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. केवळ शौचालये उभारून जबाबदारी संपत नाही, ती नियमितपणे स्वच्छ, सुरक्षित आणि वापरण्यायोग्य ठेवणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे.
“आपल्याला केवळ आजच्या समस्यांवर उपाय शोधायचा नाही, तर पुढील २० ते २५ वर्षांतील पिंपरी-चिंचवड शहर कसे असेल याचा विचार करून नियोजन करायचे आहे. शहराचा विकास करताना नागरिक हा प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या सूचना, प्रशासनाचे तांत्रिक नियोजन आणि नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा यांचा समन्वय साधून आधुनिक व गतिमान पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”— रवि लांडगे (महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
