39
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्जरोख्यांची (बाँड्स) राष्ट्रीय पातळीवर मोहोर; असोचेमतर्फे दोन मानाचे पुरस्कार प्रदान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: देशातील अग्रगण्य औद्योगिक संस्था असोचेम (Associated Chambers of Commerce and Industry of India) च्या वतीने आयोजित कॉर्पोरेट बाँड मार्केटवरील नवव्या शिखर परिषदेत व पुरस्कार सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची दखल घेत दोन मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या सोहळ्यात महापालिकेला सुवर्ण श्रेणी अंतर्गत ‘सर्वोत्तम पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन (ESG / हरित / स्थैर्य) कर्जरोखे वितरक’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर रौप्य श्रेणी अंतर्गत ‘सर्वोत्तम महानगरपालिका कर्जरोखे वितरक’ या पुरस्काराने महापालिकेस गौरविण्यात आले आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय-आर्थिक स्वावलंबन साध्य करण्यासाठी महापालिकेने एकूण ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे (बाँड्स) यशस्वीपणे उभारले आहेत. महापालिकेने भांडवली बाजारात प्रवेश करून स्वतःच्या बळावर थेट निधी उभारणीची एक अत्यंत नवी, धाडसी आणि प्रभावी दिशा निर्माण केली आहे.
हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारलेल्या या निधीद्वारे शहरातील विविध विकासप्रकल्प आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्याने चालना दिली जात आहे. महापालिकेच्या या पारदर्शक कार्यपद्धतीची आणि भरीव योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने शहराच्या लौकिकात भर पडली आहे.
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहर विकासाच्या अनुषंगाने चारशे कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारून भांडवली बाजारातून थेट निधी उभारणीची एक नवी आणि धाडसी दिशा निर्माण केली आहे. या यशस्वी उपक्रमामुळे आपल्या महानगरपालिकेला स्वतंत्रपणे निधी उभा करण्याची नवी क्षमता प्राप्त झाली असून, आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासात हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. असोचेमच्या राष्ट्रीय शिखर परिषदेअंतर्गत मिळालेला सुवर्ण श्रेणीचा सर्वोत्तम पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन कर्जरोखे वितरक आणि रौप्य श्रेणीचा सर्वोत्तम महानगरपालिका कर्जरोखे वितरक हे दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कार मिळणे ही आपल्या उत्तम प्रशासकीय नियोजनाची, दूरदृष्टीची आणि पारदर्शक कारभाराची अत्यंत महत्त्वाची पोचपावती आहे. हे यश आपल्या संपूर्ण शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
