23
प्राधिकरण परिसरातील नागरी समस्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: मधील निगडी प्राधिकरण परिसरात उपमहापौर शर्मिला राजेंद्र बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण तसेच विविध नागरी समस्यांचा विस्तृत आढावा घेतला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन समजून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हा दौरा केला.
पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी परिसरातील स्थानिक व्यापारी, रहिवासी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, दैनंदिन नागरी सुविधा तसेच इतर विविध समस्यांकडे उपमहापौरांचे लक्ष वेधले. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची दखल घेत त्यांनी आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तत्काळ पुढाकार घेतला.

नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत उपमहापौर बाबर यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आवश्यक त्या सूचना दिल्या. परिसरातील स्वच्छतेशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, नियमित स्वच्छता राखावी आणि नागरिकांना अस्वच्छतेचा कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. रस्ते, सार्वजनिक जागा आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरातील परिसरात अतिक्रमणामुळे वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी नियमांनुसार आवश्यक ती कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष हेमंत मिश्रा, नंदकुमार पाचपोर, चंद्रकांत बोडके, संग्राम साळुंखे, पवन सूर्यवंशी, कमलेश जैन, रितपाल सिंह यांच्यासह सिंधूनगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. स्वच्छता, अतिक्रमण, रस्ते आणि इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रशासनाच्या सहकार्याने प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्यासाठी काम केले जाईल.”— शर्मिला राजेंद्र बाबर (उपमहापौर, पिंपरी चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
