37
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावरच भटक्या कुत्र्यांचा ठिय्या! भाजप सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर आक्रमक; बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. खुद्द पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता, तसेच यावर तात्काळ कडक कारवाई करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच भटक्या कुत्र्यांचा मुक्काम पाहायला मिळत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या गंभीर विषयावर भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आक्रमक भूमिका घेत, प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले आहे आणि बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी प्रशासनाला धारेवर धरत सांगितले की, ज्या महापालिका भवनातून संपूर्ण शहराच्या आरोग्य व नागरी सुविधांचे नियोजन केले जाते, त्याच इमारतीच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस आणि आवारात भटकी कुत्री सर्रास फिरताना व ठिय्या मांडताना दिसत आहेत. आयुक्तांनी व्हिडिओद्वारे जाहीर आश्वासन देऊनही प्रत्यक्ष महापालिका मुख्यालयातच ही स्थिती असेल, तर शहरातील इतर भागांत महापालिकेचा आरोग्य विभाग काय काम करत असेल? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शहरातील गल्लीबोळांत आणि मुख्य रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांमुळे अपघातांचे आणि चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना निष्कारण मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका भवनासारख्या संवेदनशील ठिकाणी आणि संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. महापालिकेने कागदावर स्थापन केलेली भटक्या कुत्र्यांना पकडणारी पथके प्रत्यक्ष मैदानात उतरवून धडक मोहीम राबवावी. पकडण्यात आलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांवर आवश्यक वैद्यकीय उपचार व नसबंदी करून, त्यांना नागरिकांच्या वस्तीपासून लांब अशा कायमस्वरूपी निर्जन स्थळी हलवण्यात यावे.
नेहमीच सर्वसामान्यांच्या आणि नागरी समस्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे भाजपचे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रश्नावर थेट आयुक्तांना साकडे घातले आहे. “नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. महापालिकेने केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा,” असा इशाराही काळभोर यांनी दिला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि धडाडीच्या भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
