49
वाकडच्या प्रस्तावित मेट्रो स्थानकाला ‘भुजबळ चौक’ नाव द्या; पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे लोकप्रतिनिधींची ठाम मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पुणे मेट्रो लाईन क्रमांक ३ अंतर्गत वाकड परिसरात प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी मेट्रो स्थानकाला ‘भुजबळ चौक मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
वाकडमधील भुजबळ चौक हा केवळ एक वाहतूक टप्पा नसून तो संपूर्ण परिसराची एक ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानिक ओळख (Identity) बनला आहे. त्यामुळे या मेट्रो स्थानकाला ‘भुजबळ चौक मेट्रो स्टेशन‘ हे नाव दिल्यास नागरिकांसह प्रवाशांना ओळख पटणे अधिक सुलभ होईल आणि परिसराची ओळख अधिक ठळक होईल, असे निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.
मेट्रो स्थानकाच्या नामकरणासोबतच वाकड परिसरातील वाढत्या नागरीकरणाचा आणि वाहतूक कोंडीचा विचार करून पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याची मागणी करण्यात आली. वाकड परिसरातील प्रस्तावित डी.पी. रस्ते (Development Plan Roads) तसेच पारंपरिक शिवरस्त्यांचे विकासकाम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे रस्त्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी पर्यायी रस्ते व आधुनिक दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. अशी मागणी कार्यक्षम नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी केले.
या महत्त्वपूर्ण मागणीसाठी पीएमआरडीए आयुक्तांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष राम वाकडकर, नगरसेविका श्रुती वाकडकर, नगरसेविका रेश्मा भुजबळ, नगरसेवक कुणाल वाव्हळकर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांच्या भावना आणि वाकड परिसराची स्थानिक ओळख लक्षात घेता, प्रशासनाने या मागणीचा अत्यंत सकारात्मक विचार करून प्रस्तावित मेट्रो स्थानकाला ‘भुजबळ चौक मेट्रो स्टेशन’ असे नाव अधिकृतपणे घोषित करावे, अशी जोरदार अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
