news
Home पिंपरी चिंचवड विधानसभेपूर्वी पिंपरीच्या मतदार यादीचे ‘फिल्टरेशन’; १ लाख ६५ हजार नोंदींवर प्रशासनाची टांगती तलवार!

विधानसभेपूर्वी पिंपरीच्या मतदार यादीचे ‘फिल्टरेशन’; १ लाख ६५ हजार नोंदींवर प्रशासनाची टांगती तलवार!

आमदार अण्णा बनसोडे अन् विरोधकांना बूथनिहाय रणनीती बदलावी लागणार; निवडणूक आयोगाच्या पडताळणीने राजकीय समीकरणांना नवी दिशा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी विधानसभेत १.६५ लाख मतदार पडताळणीच्या रडारवर! सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या अण्णा बनसोडे यांच्या राजकीय गणितावर काय होणार परिणाम?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान (Special Summary Revision) पिंपरी विधानसभा मतदारसंघातील तब्बल १,६५,७९५ मतदार नोंदी सखोल पडताळणीसाठी चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदी पडताळणीच्या फेऱ्यात आल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची आणि मुख्यत्वे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही केवळ पडताळणीसाठी चिन्हांकित केलेली आकडेवारी असून ही अंतिम वगळणी यादी नाही. तरीही या आकडेवारीचे स्वरूप अत्यंत मोठे आहे. अनुपस्थित मतदार (Absent): १,१२,७३८ , स्थलांतरित मतदार (Shifted): २६,७५५ , मृत मतदार (Deceased): १८,८२७ , दुबार नोंदी (Duplicate): ७,००१ , इतर नोंदी: ४७४ , एकूण पडताळणी खालील नोंदी: १,६५,७९५

 

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अण्णा बनसोडे यांनी स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले असून ते या मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत. त्यांच्या स्थानिक पातळीवरील संपर्क, बूथ रचना आणि मजबूत संघटित नेटवर्कच्या जोरावर त्यांनी आजवरच्या निवडणुका जिंकल्या आहेत.
मात्र, आता १.६५ लाखांपेक्षा जास्त मतदारांची पडताळणी सुरू झाल्याने त्यांच्यापुढील राजकीय गणिते आणि आव्हाने  बदलू शकतात.  जर वगळण्यात येणाऱ्या नोंदींमध्ये अनुपस्थित किंवा स्थलांतरित झालेले मतदार मोठ्या संख्येने असतील, तर प्रत्यक्ष मतदानाचा टक्का कसा राहतो यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. अण्णा बनसोडे यांच्याकडे असलेला केडर बेस आणि स्थानिक निष्ठावंत मतदार कायम राहिल्यास त्यांच्या संधींवर मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही.  दुबार आणि मृत मतदारांची नावे वगळली गेल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. याचा फायदा नेहमीच सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेत्याला होतो, ज्याचा सकारात्मक लाभ बनसोडे यांना मिळू शकतो.

 

पिंपरी मतदारसंघात एकाच वेळी १.६५ लाख मतांची पडताळणी होणे म्हणजे जवळपास ३० ते ३५ टक्के मतदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे यांच्यासह विरोधकांनाही प्रत्येक बूथनिहाय आपल्या मतदारांची नव्याने पडताळणी करावी लागणार आहे. गेल्या तीन निवडणुकांपासून अण्णा बनसोडे यांच्याविरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षांना या नवीन आकडेवारीमुळे आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. जे मतदार खरोखरच मतदारसंघात राहतात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर असेल.

सध्या महापालिका आणि निवडणूक प्रशासनाकडून बीएलओ (BLO) मार्फत घरोघरी जाऊन या सर्व नोंदींची काटेकोर पडताळणी केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर होणाऱ्या अंतिम मतदार यादीत किती नावे कायम राहतात आणि किती वगळली जातात, यावरच पिंपरी विधानसभेतील आगामी राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अण्णा बनसोडे आपल्या चौथ्या विजयाची हॅटट्रिक पुढे चालू ठेवतात की नवीन समीकरणांमुळे स्पर्धा अधिक चुरशीची होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!