20
ताथवडे, पंचशील नगर व गाढा रोड परिसरातील नागरी समस्यांवर नगरसेवक कुणाल वाव्हळकर ॲक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांसमवेत केली धडक पाहणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधील ताथवडे येथील पंचशील नगर आणि गाढा रोड परिसरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष तथा गटनेते नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी ॲक्शन मोड स्वीकारत थेट घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या विविध विभागांच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष धडक पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आपल्या तडफदार कार्यशैलीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सतत धावून जाण्यासाठी ओळखले जाणारे कुणाल वाव्हळकर यांनी केवळ कागदोपत्री तक्रारी न स्वीकारता, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी स्वतः उपस्थित राहून पाहिल्या आणि त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान कुणाल वाव्हळकर यांनी परिसरातील मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे विशेष लक्ष पुरवले. खराब रस्त्यांची दुरुस्ती करणे, उघड्या गटारांचा प्रश्न सोडवणे आणि नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामांना गती देणे. पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन सुरळीत करणे, नाल्यांची वेळेवर सफाई करणे आणि कचरा गाड्यांची नियमितता राखणे. स्ट्रीट लाईट्स (दिवाबत्ती) दुरुस्त करणे, स्ट्रॉम वॉटर लाईन उभारणे आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमाणावर कायदेशीर कार्यवाही करणे.
या पाहणी दौऱ्यावेळी कुणाल वाव्हळकर यांच्यासमवेत नगरसेविका रेश्माताई भुजबळ, नगरसेविका श्रुतीताई वाकडकर, युवा उद्योजक अमर सोनवणे, युवा नेते अजित पवार, सम्राट जकाते, ललित निकाळजे, परमेश्वर गारड, अनिल दिसले, गौतम जकाते, मस्के मामा, इंगळे मावशी यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
“प्रभागातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार मूलभूत नागरी सुविधा मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. पंचशील नगर व गाढा रोड परिसरातील समस्यांची मी स्वतः अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली असून हे सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यासाठी माझा सतत पाठपुरावा सुरू राहील.”— कुणाल वाव्हळकर (शहराध्यक्ष व गटनेते: रिपाई-आठवले, सदस्य: शहर सुधारणा समिती)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
