4
निगडीतील २ कामगारांच्या जाणीवपूर्वक घेतलेल्या बळीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा; मृतांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसाहाय्य द्या — काशिनाथ नखाते
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: निगडी प्राधिकरणातील बीएसएनएलच्या (BSNL) भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये सुरक्षा साधनांअभावी रात्री १२ नंतर जाणीवपूर्वक कामाला लावलेल्या दोन तरुण कष्टकरी कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत कष्टकरी संघर्ष महासंघाचे (कसम महाराष्ट्र) अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी तात्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वर्षभरानंतर पुन्हा तीच पुनरावृत्ती घडल्याने निष्काळजी महापालिका प्रशासन, बीएसएनएल अधिकारी आणि ठेकेदारांवर तात्काळ कडक कारवाई करून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची आक्रमक मागणी काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
निगडी प्राधिकरण परिसरात घडलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेत मनोज बाबुराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय २०) या दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच कामगारांच्या हक्कासाठी अहोरात्र धडपडणारे नेते काशिनाथ नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि विषारी वायूची शक्यता असतानाही कामगारांना मास्क, ऑक्सिजन सिलेंडर अथवा कोणतीही सुरक्षा साधने पुरवली गेली नव्हती, हा ठेकेदार व प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा असल्याचे नखाते यांनी उघडकीस आणले.
विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ रोजी याच ठिकाणी अशाच स्वरूपाची भीषण दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये लखन धावारे, दत्ता होणारे आणि साहेबराव गिरशेटे या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी देखील काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली २० ऑगस्ट रोजी बीएसएनएल कार्यालय, चिंचवड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले होते.
“प्रशासनाने जुन्या घटनेतून कोणताही धडा न घेतल्यानेच आज पुन्हा दोन तरुण कामगारांचा बळी गेला आहे,” असा संतप्त सवाल उपस्थित करत नखाते यांनी प्रशासकीय नाकर्तेपणाचा जोरदार पर्दाफाश केला आहे.
मनोज शिंदे व अमोल शिंदे यांच्या कुटुंबातील वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य तात्काळ मंजूर करण्यात यावे. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी, बीएसएनएल अधिकारी व संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मागण्या मान्य न झाल्यास लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय आणि चिंचवड येथील बीएसएनएल कार्यालयावर कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. सर्वसामान्य कामगार आणि कष्टकऱ्यांच्या सुख-दुःखात कायम अग्रभागी राहून न्यायासाठी लढणारे नेते म्हणून काशिनाथ नखाते यांची जनमानसात मोठी ओळख आहे. या घटनेनंतरही त्यांनी दाखवलेली तत्परता व आक्रमक भूमिकेमुळे पीडित कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
