news
Home पिंपरी चिंचवड ‘स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवडसाठी लोकसहभाग महत्त्वाचा’; वाघेश्वर घाट सुशोभीकरण प्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!

‘स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवडसाठी लोकसहभाग महत्त्वाचा’; वाघेश्वर घाट सुशोभीकरण प्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!

'इ' क्षेत्रीय कार्यालयाचा स्तुत्य पुढाकार; कचरा वर्गीकरणाचे आवाहन करत महापालिकेने दिला स्वच्छतेचा संदेश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वाघेश्वर घाट परिसराचे सुशोभीकरण; टाकाऊ वस्तूंच्या कल्पक पुनर्वापरातून साठे नगरचे रूप पालटले!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: स्वच्छतेची जाणीव आणि सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास एखाद्या सार्वजनिक परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा कसा पालटू शकतो, याचा उत्तम प्रत्यय चऱ्होलीतील वाघेश्वर घाट परिसरात पाहायला मिळाला आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील साठे नगर, चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर घाट परिसरात धडक स्वच्छता आणि आकर्षक सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “सार्वजनिक परिसर स्वच्छ आणि निरोगी ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या स्वच्छता अभियानात नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ स्वच्छता करून न थांबता उपलब्ध सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण आणि टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील पुनर्वापर (Best from Waste) केल्यास शहराचे सौंदर्य द्विगुणित होते. स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी नागरिकांनी या चळवळीत मोलाचे योगदान द्यावे.”

या उपक्रमांतर्गत परिसरातील रस्त्यालगत आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा, अस्वच्छता पूर्णपणे हटवण्यात आली. त्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेचे आकर्षण वाढवण्यासाठी नागरिकांनी वापरात नसलेल्या तसेच टाकून दिलेल्या टाकाऊ वस्तूंचा कल्पक पुनर्वापर केला. या वस्तूंना रंगरंगोटी करून त्यांचा कलात्मक वापर करत वाघेश्वर घाट परिसराला एक नवा आणि अत्यंत देखणा लुक देण्यात आला.

महापालिकेचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, “‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची जाणीव अधिक दृढ केली जात आहे. कचऱ्याचे ओला व सुका असे योग्य वर्गीकरण करणे, उघड्यावर कचरा न टाकणे या सवयी प्रत्येकाने आत्मसात केल्या पाहिजेत.”
या प्रसंगी महापालिका प्रशासनाच्या वतीने उपस्थितांना ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करून तो महापालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आग्रही आवाहन करण्यात आले. सोहळ्यात उपस्थित नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि महापालिका कर्मचाऱ्यांना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘स्वच्छतेची शपथ’ देण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!