news
Home अकोला ‘भक्ती अन् समतेचा महामंत्र देणारे परमहंस परशराम महाराज’; लाखोंडात उजळली संतपरंपरेची उज्ज्वल ज्योत!

‘भक्ती अन् समतेचा महामंत्र देणारे परमहंस परशराम महाराज’; लाखोंडात उजळली संतपरंपरेची उज्ज्वल ज्योत!

उत्सवासाठी गावी धाव घेतात सासरवाशी मुली; अकोला जिल्ह्यातील छोटेखानी गाव बनले भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

श्री क्षेत्र लाखोंडा: परमसंत श्री परमहंस परशराम महाराजांच्या भक्तीचे अखंड दीपस्थान!

अकोला, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला/लाखोंडा : महाराष्ट्रभूमीत संतपरंपरेची अखंड गंगा शतकानुशतके वाहत राहिली आहे. याच पवित्र परंपरेत एक दिव्य ज्योत प्रकट झाली — श्री परमहंस परशराम महाराज. महाराजांच्या लीलामय चरित्रात अनेक श्रीक्षेत्रे उजळून निघाली असली, तरी त्यांच्या भक्ती-भावनेचे सर्वाधिक जिवंत आणि सक्रिय केंद्र आजही अकोला जिल्ह्यातील ‘श्री क्षेत्र लाखोंडा’ येथे पूर्ण तेजाने स्पंदत आहे. जन्मोत्सव, पुण्यतिथी सोहळा असो वा मासिक पारायण, या छोटेखानी पण परमपावन गावाने महाराजांच्या भक्तीला आपल्या प्राणात सामावून घेतले आहे.
सन १९०० मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिवशी, श्रीक्षेत्र जळतापूर (जि. अमरावती) येथे स्वर्गीय बळीरामपंत वडनेरकर (गुरव) व स्वर्गीय भिमाबाई वडनेरकर यांच्या पोटी बालरूपाने साक्षात शिवशंकर अवतरले. एकूण ५१ वर्षांच्या जीवनकार्यात त्यांनी भक्तांना भक्ती, समता आणि दिव्य अनुभवाचा संदेश दिला. होळी पौर्णिमा १९५१ मध्ये श्रीक्षेत्र इंझा (वनश्री) येथे त्यांनी वैकुंठगमन केले. महाराजांचा बहुतांश कार्यकाळ श्रीक्षेत्र पिंपळोद येथे गेला, जिथे त्यांचे प्रशस्त मंदिर व संजीवन समाधी आहे.

श्री क्षेत्र लाखोंडा हे आज महाराजांच्या भक्तिपरंपरेचे मुख्य आणि भावपूर्ण केंद्र बनले आहे. संस्थानचे अध्यक्ष शंकररावजी खवले यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सर्व ट्रस्टी, गावकरी आणि भाविक एकत्र येऊन महाराजांचा जन्मोत्सव, पुण्यतिथी उत्सव व मासिक पारायण अत्यंत भक्तिभावाने साजरे करतात.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, गावातील सासरवासी मुली दिवाळीला आई-वडिलांकडे न येताही महाराजांच्या उत्सवासाठी आवर्जून गावी धावत येतात. उत्सवादरम्यान १० ते १५ पोते गव्हाच्या पोळ्यांचा भव्य भंडारा (महाप्रसाद) आयोजित केला जातो. लाखोंडामध्ये महाराज केवळ पूज्य दैवत नसून ते संपूर्ण गावाचा प्राण आहेत.

श्री परमहंस परशराम महाराजांनी आपल्या विविध लीला आणि चमत्कारांच्या माध्यमातून समाजाला भक्ती आणि समानतेचा दीपस्तंभ दाखवला. त्याच संदेशाचे साक्षात रूप आज लाखोंडा येथे पाहायला मिळते. जिथे संपूर्ण गाव एकत्र येतो, जिथे भक्तीची नदी वाहते आणि महाराजांची कृपा प्रत्यक्ष अनुभवास येते — तेच हे पावन श्रीक्षेत्र लाखोंडा!
(विशेष सहकार्य: जयंत सुरेशराव वानखडे, अमरावती / खामगाव)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!