news
Home पिंपरी चिंचवड ‘१७ सप्टेंबर हा भारताच्या अखंडतेचा ऐतिहासिक दिवस’; पिंपरी महापालिकेच्या बेफिकीर कारभारावर अरुण पवार आक्रमक!

‘१७ सप्टेंबर हा भारताच्या अखंडतेचा ऐतिहासिक दिवस’; पिंपरी महापालिकेच्या बेफिकीर कारभारावर अरुण पवार आक्रमक!

शाळांमध्ये जनजागृती अन् स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाची मागणी; आगामी काळात अधिकृत सोहळा साजरा करण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर; प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांचा तीव्र संताप!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासातील अत्यंत सुवर्ण पान असलेल्या १७ सप्टेंबर या ऐतिहासिक दिवसाला ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून दरवर्षी देशभरात साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अधिकृत राजपत्राद्वारे घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या स्पष्ट निर्णयानंतरही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसाचे साधे स्मरणही न केल्याने महापालिका प्रशासन आणि शहरातील राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर आणि उदासीन कारभारावर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवार म्हणाले, “भारत सरकारच्या १२ मार्च २०२४ रोजीच्या राजपत्रात (CG-DL-E-12032024-252904) हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीचा थोर इतिहास स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी हैदराबाद संस्थानातील जनता आणखी १३ महिने निजामाच्या जुलमी राजवटीखाली पिसली जात होती. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने अखंड भारताच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान स्मरणात राहावे, यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.”

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आज सुमारे तीन लाखांहून अधिक मराठवाडावासीय नागरिक वास्तव्यास आहेत. केंद्र सरकारने अधिकृत राजपत्र काढून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले असताना, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने या दिवसाकडे पाठ का फिरवली, असा रोकडा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
शहरात दरवर्षी विविध राष्ट्रीय दिन, महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त महापालिका स्तरावर शासकीय कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, भारताच्या एकात्मतेचा भाग असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी हुतात्म्यांना अभिवादन, व्याख्यान, इतिहास प्रदर्शन किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम राबवण्याचे सौजन्यही पालिका प्रशासनाने दाखवले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

“१७ सप्टेंबर हा केवळ एका ठराविक प्रदेशाचा दिवस नसून, भारताच्या अखंडतेचा आणि स्वातंत्र्याचा ऐतिहासिक दिवस आहे. महापालिकेच्या दालनात इतर कार्यक्रमांचे आयोजन नियमित होते; मग मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणासाठी आणि नव्या पिढीला इतिहास सांगण्यासाठी एक दिवस देणे प्रशासनाला एवढे कठीण का जावे? शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, चित्रफिती, निबंध स्पर्धा व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आयोजित केला तरच ही खरी आदरांजली ठरेल.”
— अरुण पवार (संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ)
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतातरी आपली चूक दुरुस्त करून आगामी काळात १७ सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे आणि भव्य स्वरूपात साजरा करावा, अशी आग्रही मागणी शहरातील सामाजिक वर्तुळातून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!