5
सांगवीत ७ व्या दिवशी डी.जे.चा दणदणाट करणाऱ्या १० गणेश मंडळांवर पोलिसांची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नियम व आदेश धुडकावून उच्च क्षमतेचे डी.जे. आणि डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजवून प्रचंड ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर सांगवी पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. ७ व्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ ते १० गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ५ डी.जे. मिक्सर, ३ डी.जे. कन्सोल, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि साऊंड सिस्टीम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डी.जे., डॉल्बी साऊंड सिस्टीम व ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांवर कायदेशीर बंदीचे आदेश जारी केले आहेत. याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना लेखी सूचना दिल्या होत्या.
दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ९० गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या. यातील ९ ते १० गणेश मंडळांनी पोलिसांच्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करत उच्च क्षमतेचे डी.जे. लावून मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण केले. याची गंभीर दखल घेत सांगवी पोलिसांनी धाडसी कारवाई करत ०५ डी.जे. मिक्सर, ०३ डी.जे. कन्सोल, ०१ लाईट कंट्रोल मशीन, ०३ लॅपटॉप व ०१ स्पीकर, ०१ डी.जे. सेट (ट्रॅक्टर, ट्रॉली व स्पीकरसह) मुद्देमाल घटनास्थळावरून ताब्यात घेतला. सदर प्रकरणी संबंधित गणेश मंडळांचे पदाधिकारी, डी.जे. चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई सध्या वेगाने सुरू आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ १) संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त (सांगवी विभाग) मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेश कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदेकर, सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे, पाटील, बोराडे, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पाटील, जावळे, आकमवाड, बाराते, कांबळे, जाधव, पोलीस अंमलदार साळुंखे (८५४), फाळके (१२०३), आहेर (२५४५) आणि सांगवी तपास पथकाने सहभाग घेतला.
“श्री गणेशोत्सव २०२६ च्या कालावधीत व आगामी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही गणेश मंडळाने उच्च क्षमतेचे डी.जे. किंवा डॉल्बी साऊंड सिस्टीम लावून ध्वनिप्रदूषण करू नये. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कोणतीही पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल, ज्यास मंडळाचे पदाधिकारी व आयोजक स्वतः जबाबदार राहतील.”— संदीप आटोळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, पिंपरी-चिंचवड)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
